भर चौकात युवकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी कायदा सुव्यवस्थेबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. याची दखल सरकारने घेत येथील पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. तर दुसरीकडे एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्या व्हिडीओ मध्ये चक्क आमदाराचे सासरे नंदकिशोर मुंदडा कायदा हातात घेताना दिसत आहेत. जनतेने तुम्हाला निवडूण दिले म्हणजे तुम्ही तुमची मनमानी करणार का? त्या युवकाचे काही चुकले असेल तर त्याला शिक्षा देण्यासाठी कायदा आहे, तुम्हीच का कायदा हातात घेतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चालू अधिवेशनात केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग सुद्धा सांगितला होता. सेल्फीमुळे त्याठिकाणी वाद झाला होता, सेल्फी काढू न दिल्यामुळे काही लोकांनी वाद सुद्धा घातला. हा सर्व प्रकार चुकीचाच आहे. असा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु त्याच दिवशीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून त्या व्हिडीओ मध्ये आमदाराचे सासरे चक्क एका युवकाला जबर मारहाण करताना दिसत आहेत. तसेच त्या युवकांना शिवीगाळ करताना सुद्धा दिसून येत आहेत. एखादी व्यक्ती काही गुन्हा करत असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा देण्यासाठी एक न्याय प्रक्रिया बनवण्यात आलेली आहे. परंतु आमदाराचे सासरे कायदा हातात घेत आहेत.