एवढ्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होऊन सुद्धा मुख्यकार्यकारी अधिकारी त्या पदावर कायम कसे!
-316 कोटीचा गैरव्यवहार करुन सुद्धा काहीच कारवाई होईना!
–गैरव्यवहार करणाऱ्यांची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : येथील द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बँकेवर प्रशासक आण्यात आले. प्रशासक आता कशाप्रकारे काम करते हे पाहणे गरजे आहे. परंतु ज्यांनी कोटी रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यास विलंब होत असल्याचे दिसत आहे. यात विशेष म्हणजे ज्या वेळेस 316 कोटींचा गैरव्यवहार झालेला होता, त्यावेळेस जे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून पदावर असणारे आर.व्ही.सोनी सध्याही त्यापदावर कायम कसे? यासह इतर बाबींमुळे दोषींना कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? यासह इतर महत्वांचे प्रश्न उपस्थित होत आहेत.
द्वारकादास मंत्री सहकारी बँकेने मागच्या 9 वर्षात 316 कोटी रुपये बेकायदेशीररीत्या हातोहात वापरुन 500 लोकांच्या नावावर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे कर्ज उचलले. अशी तक्रार प्रकाश झुंबरलाल राका व दिपक प्रकाश राका यांनी विभागीय सहनिबंधक लातुर, जिल्हाधिकारी बीड व उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्याकडे दिली होती. यामुळे बँकेतील ठेवीदार व ग्राहक यांच्या एक चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक जण बँकेतुन आप-आपल्या ठेवी काढून घेऊ लागले आहेत. गेल्या चार पाच दिवसात बँकेतुन मोठ्या प्रमाणात ठेवी काढण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु विशेष म्हणजे ग्राहकांच्या रक्कमेची हेराफेरी करणारे बँकेचे अध्यक्ष सुभाष सारडा व संचालक मंडळावर आता पर्यंत कोणतीच कारवाई झाल्याचे दिसत नाही. तसेच या प्रकारणी संबंधित विभागाकडून दिरंगाई सुद्धा होताना दिसत आहे. यामुळे यातील दोषींना वाचवण्यासाठी कोणता मोठा नेता प्रयत्न करत आहे? किंवा संबंधित अधिकारी व यांचे काही संबंधत आहेत का? यासह इतर प्रश्न याठिकाणी उपस्थित होऊ लागले आहेत.
प्रशासक येण्याचे कारण!
द्वारकादास मंत्री सहकारी बँकेत सन 2010-2011 ते 2011-19 या नऊ वर्षात काही कोटी रुपये शाखा येणे फरक या सदराखाली दाखवून 9 वर्षात 316 कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष व संचालक मंडळाने स्वत:च्या उपयोगासाठी वापरले असल्याची शक्यता आहे. येथील गैरव्यवहारा बाबत राका यांची तक्रार गेल्यानंतर व मा.भारतीय रिझर्व बँकेच्या वैधानिक तपासणीच्या आधारे, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशांनुसार बँकेवर प्रशासक आण्यात आले. प्रशासक म्हणून विश्वास देशमुख (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बँकेतील ठेवीदारांना जाहीर निवेदनातुन सर्व ठिक होऊल असे आवहान सुद्धा केलेले आहे. यामुळे ते या प्रकारणात कसे काम करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कायम कसे!
द्वारकादास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही. सोनी यांच्या कार्यकाळात बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेले आहेत. यानंतर याठिकाणी प्रशासक नेमण्यात आले हे जरी खरे असले तरी याठिकाणी ज्यांवर दोषी असण्याची शक्यता आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी अजून सुद्धा त्याच पदावर कसे काय? हा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
बँकेच्या चेअरमन पदावर सुभाष सारडा यांना हटवले पण कारवाईचे काय?
द्वारकादास मंत्री बँकेत मागिल नऊ वर्षात 316 कोटीचा गैरवापर व 500 लोकांवर प्रत्येकी 5 लाख रुपये कर्ज उचल्याचे समोर आल्यामुळे द्वारकादास मंत्री बँकेवर प्रशासक नेमण्यात आले आहे. परंतु बँकेचे चेअरमन सुभाष सारडा व त्यांच्या संचालक मंडळाला जरी हटवले असले तरी त्यांच्यावर कारवाई कधी होणार आहे. फक्त बँकेवर प्रशासक आणून चालणार नाही तर या गैरव्यवहारात जे दोषी आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जर दोषींवर कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात जिल्ह्यातील अनेक बँकेत असेच गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे संबंधित विभागाने यात लक्ष देत, येथील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच गरज आहे.