बीड प्रतिनिधी :- वादळी-वारा व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.सोमवारी रोजी बीड मतदारसंघातील बीड शहर आणि ग्रामीण भागात अचानक वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विविध नुकसानग्रस्त ठिकाणी तात्काळ जाऊन पाहणी केली. झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे शेतीचे तसेच नागरिकांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानींचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना शासनस्तरावरून मदत करण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला आ.क्षीरसागर यांनी निर्देश दिले आहेत.
विद्युत व्यवस्था सुरळीत करण्याच्या सूचना
अचानकपणे जोरदार वादळी वारे सुटल्याने विद्युत वितरणाची व्यवस्था विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या तसेच विद्युत खांब पडले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. बीड शहर आणि ग्रामीण भागात तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही आ.संदीप क्षीरसागर यांनी विद्युत विभागाला दिल्या आहेत.