आहिल्यानगर : beed व आहिल्यानगर जिल्ह्यातील बीएसएनएलच्या सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आज आहिल्यानगर येथे झालेल्या जिल्हा दूरसंचार समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष खासदार बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत फटकारले. “युद्धपातळीवर काम करा, नाहीतर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल,” असा इशारा दिला.
या बैठकीस आहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके, बीएसएनएलचे महाप्रबंधक राजेंद्रसिंग चोंगड, बीडचे सहमहाप्रबंधक बी. एस. अनारे, नगर विभागाचे श्री. वाघ, ए.ए. कुलकर्णी, प्रशांत सिंग तसेच राजू थोरात, दीपक जोशी, व्ही. बी. जोशी, अनंत्रे, दिनेश मालू, विजय पिंपरकर, योगेश सुले आदी अधिकारी उपस्थित होते.
खासदार सोनवणे यांनी यापूर्वी ४६१ गावांना बीएसएनल नेटवर्क येत नसल्यामुळे अशा गावांची यादी करुन तिथे ४जी टॅावर उभे करण्याच्या कामास मंजुरी मिळविली होती. यातील अद्याप सेवावंचित असलेल्या गावांमध्ये तातडीने ४जी टॉवर्स उभे करून सेवा सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. जिल्ह्यातील सर्वच गावांना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे जोडण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डिजिटल भारत निधी योजनेअंतर्गत सर्व शासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित संस्था, बॅंका इत्यादींना बीएसएनएल ४जी व ब्रॉडबँड सेवा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेषतः ज्या गावांत ४जी सेवा आधीपासून आहे, त्या ठिकाणी सुविधा अपग्रेड करून ५जी सेवा देण्यासाठी नियोजन सुरू आहे.
जलजीवन योजनेमुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा
बैठकीत जलजीवन योजनेतील पाईपलाईनच्या खोदकामामुळे बीएसएनएलच्या केबल लाईन्सच्या झालेल्या नुकसानीबाबत चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. यावर खासदार सोनवणे यांनी पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव जल मंत्रालयाला तत्काळ पाठविण्याचे आदेश दिले.
कामात दिरंगाई – अधिकाऱ्यांना खडसावले
बैठकीदरम्यान, विभागीय कामात होत असलेल्या दिरंगाईवर खासदार सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली. “गरज असल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीनंतर दूरसंचार विभागात खासदार सोनवणे यांनी घेतलेली ही पहिलीच बैठक गाजल्याची जोरदार चर्चा सुरू होती.
या बैठकीतून बीएसएनएलच्या सेवा सुधारण्याची दिशा ठरली असून, नागरिकांना भविष्यात अधिक मजबूत व जलद इंटरनेट सेवा मिळण्याची शक्यता आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासन आता अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा आहे.