बजरंग सोनवणेंचा मुंडे – फडणवीसांच्या पक्षांतर्गत कुरघोडीवर निशाणा
बीड / शिरूर / राक्षसभुवन : भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या आपल्या केंद्रातून उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगत आहेत. त्यांचा राज्याच्या नेतृत्वावर भरोसा नाही का ? अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया विकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी करीत मुंडे – फडणवीसांच्या पक्षांतर्गत कुरघोडीवर सोनवणेंनी निशाणा साधला. ते राक्षसभूवन (ता. शिरूर कासार ) येथे बोलत होते.
बीड लोकसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी शिरूर तालुक्यातील वैद्यकीन्ही, भिल्लारवडी, जेधेवाडी, जाटनांदूर, चावरवाडी, वडाळी, सवासवाडी, सिंदफणा, गोमाळवाडा, रुपुर, कोळवाडी, शिरूर कासार, कान्होबाचीवाडी, झापेवाडी, राक्षसभुवन येथे मतदारांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला.
यावेळी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या त्यांची उमेदवारी ही भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीने जाहीर केल्याचे जनतेला सांगत आहेत. मात्र त्या भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस असताना त्यांचा कदाचित राज्यातील भाजपच्या नेतृत्वावर विश्वास नसेल. म्हणूनच त्यांची भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणीतून उमेदवारी जाहीर झाली असावी. जर त्यांची उमेदवारी ही केंद्रीय समितीने जाहीर केली असेल तर त्यांना मते कोण देणार ? आता राज्यातील की देशातील मतदार मते देणार ? असा सवाल उपस्थित करीत कोणाचे नाव न घेता त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजाताई मुंडे यांच्या पक्षांतर्गत कुरघोडीवर निशाणा साधला. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील स्वाभिमानी मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याची विनंती केली.
प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष व इंडिया आघाडीतील मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बजरंग सोनवणेंची बैलगाडीतून मिरवणूक
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे व महेबुब शेख हे जेधेवाडी व जाटनांदूर येथे गेले असता या गावातील नागरिकांनी त्यांना बैलगाडीत बसवून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली. तर राक्षसभवन येथे एका विवाह सोहळ्यात वधू – वरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी गेले असता वऱ्हाडी मंडळींनी त्यांचे उस्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी त्यांनी नव वधू – वरांना शुभेच्छा दिल्या.