दिंद्रुड पोलीसांत गुन्हा दाखल
माजलगाव (प्रतिनिधी )
मार्च व एप्रिल महिना म्हणजे ऊसतोड मजूर व ऊसतोड मुकादम यांच्या आर्थिक हिशोबावरुन संघर्षाचा काळ हा नेहमीचाच विषय झालेला आहे ऊस तोडी वरुन पैशांची देवाण-घेवाण यावरून ऊसतोड मुकादम व ऊसतोड मजुरांमध्ये होणारी बाचाबाची, भांडणे हे नवीन नाहीत. मात्र या भांडणांमध्ये तलवार ,कोयते, लोखंडी बांबू आदी वस्तूंचा वापर होणे म्हणजे विघातक कृतींचे लक्षण आहे. अशीच घटना दिंद्रुड पोलीस हद्दीत शुक्रवारी घडल्याने तब्बल 19 जणांवर दिंद्रुड पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील मोगरा येथील ऊसतोड मुकादम दगडू भागोजी घनगाव यांचे मोगरा येथीलच सुरज जिजाभाऊ आलाट यांच्यासह 13 ऊस तोड मजूरांकडे ऊस तोडी ची पैशांची शिल्लक बाकी होती त्याबाबत घनगाव यांनी आलाट यांच्याशी संपर्क साधला असता तुझे पैसेही देत नाहीत आणि तुझ्याकडे काम ही करायला येत नाहीत काय करायचे तर कर असे म्हणून आलाट यांनी दमदाटी करत काट्या,कुऱ्हाडी,तलवार,कोयते,लोखंडी बांबू आदी वस्तूंनी मारहाण केली या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले असल्याची तक्रार दगडू भागोजी घनगाव यांनी दिंद्रुड पोलिसांत केली असुन आरोपी मनोज जिजाभाऊ आलाट, सुरज जिजाभाऊ आलाट, बाळू सर्जेराव आलाट, अमर सर्जेराव आलाट, पवन सटवा कांबळे, किशोर विश्रांता आलाट,संजय मदन आलाट, भाऊ बापू शिंदे, राजेभाऊ मदन आलाट आदींवर दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच भांडणात सुरज जिजाभाऊ आलाट या उसतोड मजुराच्या फिर्यादी वरुन दगडू भागोजी घनगाव, यादा खंडू घनगाव, सुरेश आत्माराम घनघाव, मधुकर भीमराव घनघाव,विकास साधू घनघाव, सुनील संदिपान चोपडे,बाळू रामा घनघाव,आकाश घनघाव, सुभाष घनघाव,साधु घनघाव आदी विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असुन या भांडणात गंभीर जखमींवर बीड शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भादवी कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९,शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये कलम ४,२५ नुसार भांडणातील सर्व आरोपींवर दिंद्रुड पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असुन या प्रकरणात दिंद्रुड पोलीस स्टेशन चे सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, पोलीस बीट अंमलदार नंदु वाघमारे तपास करीत आहेत.