बीड प्रतिनिधी : शेती मालाची लुट होऊ नये. शेतीमालाला योग्य भाव मिळावा. शेतकर्यांना सुविधा उपलब्ध करून देणे. खरेदी व्यवहारातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा या हेतूने बाजार समित्या अस्तित्वात आल्या.परंतु बीड बाजार समितीने कायम शेतकऱ्यांच्या हितापेक्षा संचालकांचाच फायदा बघितला. आजवरच्या इतिहासात बीड बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी इकही अभिनव उपक्रम राबवला नाही. कापूस खरेदीत भ्रष्टाचार, पैसे घेऊन टोकन वाटले. तुर, उडीद खरेदीत घोटाळा झाला. भूखंड घोटाळा झाला. कवडीमोल किमतीने बाजार समितीची जागा विकली गेली. असे अनेक घोटाळे जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहेत. घोटाळे करण्यात पटाईत असणारे, असे अनुभवी संचालकांनाच त्यांनी उमेदवारी दिली आहे. याचाच अर्थ जयदत्त क्षीरसागरांना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी नसून, केवळ बाजार समितीवर कब्जा कायम ठेऊन, मलिदा लाटण्यासाठी खेळी आहे. या खेळीला मतदार बांधवांनी बळी पडू नये असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव तथा न.प.चे माजी सभापती नवनाथ शिराळे यांनी केले आहे.
व्यापारी मतदार संघात केवळ दीडशे व्यापाऱ्यांचीच नोंद का ? हा प्रश्न बीड बाजार समितीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फार मोठे काम केले असे डंका वाजवणाऱ्या क्षीरसागरांना विचारला पाहिजे. कारण बाजार समिती ताब्यात राहण्यासाठी ओरिजिनल व्यापाऱ्यांच्या नावाची नोंदणी जाणीवपूर्वक टाळली. कागदोपत्री नोंद दाखवून अनेकांची व्यापारी म्हणून नावे घुसडली आहेत. ही बोगस कामे आता बंद करावे लागेल.बीड बाजार समिती लुटारूंच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी – शिवसेना – काँग्रेस – शिवसंग्राम- आरपीआय – रासप प्रणीत शेतकरी परिवर्तन महाआघाडी हा पर्याय मतदारांना दिला आहे. सर्व उमेदवार शेतकरी पुत्र असून, सामान्य कुटुंबातील प्रामाणिक माणसं आहेत. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी महापरीवर्तन आघाडीतील उमेदवारांच्या कपबशी चीन्हासमोर मतदान करून सर्वांना संचालक म्हणून निवडून द्या. असे आवाहन नवनाथ शिराळे यांनी केले आहे.