नवगण राजुरी प्रतिनिधी : – पाणी, रस्ते, नाली, स्वच्छता सगळे प्रश्न प्रलंबीत आहेत. विकास नसल्यामुळे गाव मागे पडले आहे. नवगण राजुरी गावचा विकास करण्यासाठी नवगण परिवर्तन विकास पॅनलला साथ द्या असे प्रतिपादन युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.
रविवार दि. 11 रोजी संकष्ट चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नवगण राजुरीचे ग्रामदैवत श्री गजाननाचे दर्शन घेऊन युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते नवगण परिवर्तन विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.पुढे बोलतांना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, नवगण राजुरी परिसरातील आसपासच्या गावाचा विकास झाला,परंतु राजुरी गावचा विकास झाला नाही. ग्राम पंचायत निवडणूकीच्या प्रचाराची आणि गावच्या परिवर्तनाची आता सुरूवात झाली आहे. ही निवडणुक अत्यंत महत्वाची आहे. पुर्वी सारखी आता परिस्थिती राहिली नाही, परिस्थिती आता बदलली आहे.मतदार संघात बदलाचे वारे आहे. मागच्या वेळी ग्राम पंचायतच्या निवडणुक काठावर झाली.यावेळी आपल्याला चांगले वातावरण आहे. आपलं गाव पुढे नेण्यासाठी आणि गाव आदर्श करून ग्राम पंचायतच्या कारभार पारदर्शक चालवण्यासाठी आपल्या हक्काची ग्राम पंचायत पाहिजे. बदल घडवायचा मतदाराच्या हातात आहे. मतदारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान केले पाहिजे.हे गाव काकु-नानांच गाव आहे. गावाने पहिल्यापासून साथ दिलेली असुन अशीच साथ कायम द्यावी. एकतर्फी मतदान देणार हे गाव विकासापासून वंचित आहे. गावच्या विकासासाठी नवगण परिवर्तन पॅनलने तरूण तडफदार उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यांना साथ द्या. वित्त आयोगाचे बजेट थेट ग्राम पंचायतला आहे.पारदर्शक कारभार चालवण्यासाठी आपल्या हक्काची ग्राम पंचायत असायला हवी. गेल्या विधान सभा निवडणुकीत ज्या आशेने जनतेने निवडुन दिले, परंतु गेल्या तीन वर्षात जनतेची निराशा झाली.झालेली चुक जनता आता पुन्हा करणार नाही असे यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. याप्रसंगी नवगण परिवर्तन विकास पॅनलचे सर्व उमेदवार, कार्यकर्ते, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रा.कॉ.पक्षाचे नवगण राजुरीतील सेवा सहकारी सोसायटीचे संचालक मुरलीधर बहीर यांचे पुत्र अरूण बहीर यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन जाहिर प्रवेश केला.याच वेळी माजीमंत्री क्षीरसागर हे अहमदनगर दौऱ्यावर जात असताना राजुरीत श्री गणेशाच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले