बीड प्रतिनिधी ः- गुरुनानक हे शिखांचे पहिले गुरू आणि शीख धर्माचे संस्थापक होते. गुरुनानक यांनी जगातून अज्ञान दूर करून अध्यात्मिक शक्ती आत्मसात करण्याची प्रेरणा दिली. हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे असे ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु गुरुनानक हे एक महान पुरुष होते असे प्रतिपादन डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी केले.
शहरातील सहयोग नगर भागातील गुरुनानक दरबार येथे गुरूनानक जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित समाज बांधव आणि भगिनींना गुरुनानक जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बोलताना डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले की, गुरुनानक देव महाराज हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर ते संपूर्ण मानव जातीसाठी होते. तसेच संपूर्ण मानव जात त्यांच्यासाठी होती. बदलत्या काळात ’लंगर’ आणि ’कर सेवा’ हि शिख धर्माची विशेष नोंद घेण्यासारखी तत्वे जगाने स्विकारली पाहिजेत. ’भुकेल्यांना अन्न’ हे महान तत्व लंगर सारखी कृतीशिल बाब जर सर्वच धर्म आणि धार्मिक स्थळांनी अंगिकारली तर जगात कुणीच ईश्वराचा पुत्र-पुत्री उपाशीपोटी झोपणार नाही. अन्नदानाचे हे महान लोकतत्व जर जगातील सर्वच धर्मांनी अंगिकारले तर शिख धर्माचे संस्थापक श्री गुरूनानक देव यांनी स्थापन केलेल्या नव्या विचाराच्या शिख धर्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि हीच श्री गुरुनानक देव यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली असेल. गुरुनानक देव यांची जयंती आपण खर्या अर्थाने तेव्हा साजरी करू शकतो जेव्हा आपण त्यांच्या शिकवणुकींना आपल्या जीवनात धारण करून त्यानुसार जीवन जगू असे डॉ.योगेश भैया क्षीरसागर यांनी सांगितले.
यावेळी समवेत मदन जेसवाणी, दिपक अहुजा, ईश्वर टेकवाणी, विनय कथुरिया, अनिल कुकडेजा, बन्सी टेकवानी, अमर टेकवानी, राजू कुकडेजा, हरीश मोटवानी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.