गेवराई प्रतिनिधी : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अजूनही पाऊस सुरुच असल्यामुळे सर्वत्र पिकांची नासाडी झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीतही सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सरकारने शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली नाही तर शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण रस्त्यावर उतरू लढा देवू. नुकसान झालेल्या मंडळात सरसकट पिकांचे पंचनामे करून तात्काळ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या मदत देण्याची मागणी करून शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला आहे. उमापूर, चकलांबा परिसरामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना ते बोलत होते.
गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी आज उमापूर, चकलांबा, माटेगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पिकांची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना विजयसिंह पंडित पुढे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आधीच आर्थिक संकटात होता पुन्हा खरीपाच्या नासाडीने संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा विचार कोणीही करत नाही. शेतकऱ्यांना मदत करायची सोडून सत्ताधारी राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देवून शेतकऱ्यांना मदत मिळवून देवू असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून धिर दिला. विजयसिंह पंडित यांनी माटेगाव, चकलांबा, उमापूर महसुल मंडळातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.
याप्रसंगी माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, विजयकुमार घाडगे, पं.स.सदस्य शेख तय्यबभाई, माजी सरपंच मारुतराव घुमरे, रावसाहेब देशमुख, तुळशीदास औटी, जयदीप औटी, यादवराव त्रिंबके, अजहर इनामदार, विष्णूपंत दळवी, अविनाश आहेर, किशोर आहेर, राहुल देशमुख, मधुकरनाना खेडकर, भाऊसाहेब घाडगे, अंकुश सोनवणे, विक्रम राठोड, भागवत खेडकर, अशोक फाटक यांच्यासह चकलांबा सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.