बीड : शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष भगीरथ दादा बियाणी यांनी आज सकाळी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी कानावर पडली. या दु:खद बातमीने मला व भारतीय जनता पार्टी परिवाराला प्रचंड धक्का बसला. भगीरथ दादा राजकीय व सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेऊन काम करत होते. दांडगा जनसंपर्क, कार्यकर्ते आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याची आवड त्यांचा अंगी होती. दवाखाना, पोलीस स्टेशन अथवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास भगीरथ दादांचे नाव पुढे येत असे. ब्लड कार्डासाठी रात्री अपरात्रीही रुग्णांना मदत करत होते. आज अचानक त्यांच्या जाण्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मोठे नुकसान झाले असून, पक्षाने धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. अशी दु:खद प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान स्मरणीय आहे. विद्यार्थ्यांना मदतीचा हात त्यांनी दिला. विद्यार्थी व युवकांमध्ये वाद होऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न असत.शांत व मनमिळाऊ स्वभाव, आणि अभ्यासू युवा नेता म्हणून सर्वांना परिचित व प्रिय होते. सर्वाना बरोबर घेऊन काम करण्याची हातोटी असल्यामुळे त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते यशस्वी पणे पार पाडत. अमृत महोत्सवी 15 ऑगस्ट तिरंगा यात्रा अत्यंत नाविन्यपूर्ण व नियोजनबद्ध पूर्ण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा ठरला. या दु:खद घटनेमुळे बियाणी परिवार व भाजपा परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांना हा दुःखाचा डोंगर पेलण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो. हीच प्रार्थना.