बीड प्रतिनिधी: सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जनता दखल घेईलच, असे सांगता येत नाही. मात्र सातत्याने केलेल्या कामाची दखल दृश्य आणि अदृश्य स्वरूपात जनता घेत असते. गेल्या अडीच दशकांहून जास्त काळापासून चालू असलेल्या माझ्या सातत्यपूर्ण कामाची दखल रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन ने घेतल्याने समाधान वाटलं. हा पुरस्कार मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर या पुरस्कारामुळे आणखी जबाबदारीत वाढ झाली असल्याचे जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.
पुरस्कार वितरण प्रसंगी हॉटेल अंविता येथे झालेल्या भव्य अशा कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. सामाजिक काम करत असतानाचे अनेक पैलू त्यांनी यावेळी उलगडले. हे काम एका दिवसात होत नाही. त्याला सातत्य लागते, असे सांगत त्यांनी काही मुद्द्यांवर दिल्ली आणि अनेक मुद्द्यांवर राज्य शासनाने कशी दखल घेतली, हे सांगत व्यवस्था परिवर्तनासाठी आपण मोठे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
रोटरीचे डीजी श्री. ओमप्रकाश मोतीपवळे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी बोलताना म्हटले की, जागल्याची भूमिका घेणे आता चुकीचे ठरत आहे. सरकार अशा लोकांच्या विरोधात असते. त्यामुळे रोटरीने देशमुख यांच्या मागे राहणे आवश्यक झाले आहे. देशमुख यांची निवड ही चांगली ठरली असून या पुरस्कारामुळे त्यांच्या सामाजिक कार्यात आणखी भर पडेल, असेही त्यांनी म्हटले.
रोटरीचे अध्यक्ष राजकुमार बंब, सचिव इंजिनीयर आरिफ काजी, यांचेसह अन्य यांनी या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांनी देशमुख यांच्या अनेक कामावर प्रकाश टाकला. देशमुख हे प्रशासनाच्या विरोधात नाहीत. मात्र त्यांनी घेतलेला मुद्दा लावून धरतात. आणि समाज परिवर्तनासाठी ते सातत्याने लढत असतात, असे म्हटले.
याप्रसंगी अनेकांनी आपले मत व्यक्त केले. इंजिनियर नितीन गोपन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन इंजिनीयर आरिफ काझी यांनी केले. यावेळी रोटरीचे अक्षय शेटे, हरीश मोटवानी, सूर्यकांत महाजन यांचेसह सर्व पदाधिकारी, सदस्य त्याच प्रमाणे देशमुख यांचे मित्र मंडळ आणि परिवार उपस्थित होता.