अहमदनगर येथून स्थानिक गुन्हे शाखेने आवळ्या मुसक्या
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : तालुक्यातील बकरवाडी येथील महिला दगावल्यानंतर जिल्ह्यात परत गर्भपात प्रकरण गाजले. यानंतर पोलीस यंत्रणेसह जिल्हाशल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेत यंत्रणा हलवली होती. यात पाच जणांवर गुन्हे नोंद केल्यानंतर गर्भलिंग निदान करणारा मुख्य आरोपी पकडण्यास पोलीसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीस अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास अजून सुरुच असल्याची माहिती पत्रकार परिषद मध्ये पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ यांची उपस्थिती होती.
गर्भलिंग निदान चाचणी करणारा मुख्य डॉक्टर आरोपी नामे सतीष बाळु सोनवणे (रा.जाधववाडी ता.जि. औरंगाबाद) याला पोलीसांनी अहमदनगर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांने वरील गुन्हयातील मयत महिलेची गर्भलिंग निदान चाचणी केल्याची कबुली दिली आहे. हा डॉक्टर प्रत्येक शनिवारी गेवराईत येत होता. त्याला एका पेशंटचे दहा हजार रुपये मिळायचे, आरोपी एजंट महिला येथील सर्व नियोजन करुन ह्या डॉक्टरला फोन करत होती. गेल्या चार महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. यात पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस अधिकारी व अमंलदार तसेच पोलीस स्टेशन पिंपळनेर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
सदरील मुख्य आरोपीचे शिक्षणच सुरुय
पोलीसांनी पकडलेला मुख्य डॉक्टर आरोपी तामिळनाडू येथे शिक्षण घेत असल्याची माहिती आरोपी डॉक्टरने दिली आहे. याच अनुषंगाने पुढील तपास पोलीस करत असून यात अजून काही माहिती मिळतेय का याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत.