जिल्हा परिषद नूतन इमारतीच्या माध्यमातून सामान्य, मागास व गरीब जनतेच्या विकासाचे काम व्हावे- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, लोकनेते स्व.सुंदरराव सोळंके या पुतळ्यांचे भूमिपूजन करून जिल्हा परिषद नूतन इमारतीचे लोकार्पण
बीड : जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीच्या माध्यमातून सामान्य, मागास व गरीब जनतेचे काम व्हावे. त्यांचा विकास व्हावा, असे प्रतिपादन ग्राम विकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
बीड जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीचे कोल्हापूर येथून ऑनलाईन उपस्थितीद्वारे लोकार्पण केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महसूल, ग्राम विकास, बंदरे खार जमीन विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार विनायक मेटे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पंचायत राजची संकल्पना राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मांडली. यातून सत्तेचे विकेंद्रीकरण केले गेले, असे स्पष्ट करून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला थेट निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हा मोठा निधी उपलब्ध असून त्यामधून अधिक चांगले काम होणे अपेक्षित आहे. कोरोना कालावधीत बीड जिल्हा परिषदेने चांगले काम केले आहे. देशाच्या रक्षणासाठी लढणारे माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता कर माफ करण्याचा देखील निर्णय चांगला आहे, असे ते यावेळी म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या नूतन वास्तूमध्ये बसून काम करताना पदाधिकारी व अधिकारी यांनी मागास म्हणून उल्लेख होणाऱ्या बीड जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्याचा नवीन पॅटर्न देशात नावाजला जाईल. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गाव विकसित करणे आणि स्वावलंबी करणे हा आपला उद्देश आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागांच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवत आहे. जिल्ह्यातील पांदण रस्ते विकासासाठी 273 कोटी रुपये मंजूर करण्यात आले, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या सुसज्ज नवीन प्रशासकीय इमारतींना मंजुरी देताना जिल्हाधिकारी कार्यालय व विश्रामगृहासाठी नवीन इमारतीला मान्यता दिली आहे याच बरोबर आज उद्घाटन झालेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत अजून दोन मजले बांधण्यात येणार असून सुधारित पस्तीस कोटी रुपयांची मान्यता दिली आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
बीड जिल्ह्याला मागासलेला जिल्हा ही ओळख पुसून टाकायची असेल तर सर्वपक्षीय नेत्यांनी एका व्यासपीठावर येऊन, सकारात्मक विकासकामे हाती घ्यावीत; जिल्ह्यातील नगर बीड परळी रेल्वे मार्गास केंद्र व राज्य सरकारने प्रमाणात निधी द्यावा व हे काम वेगाने पूर्ण केले जावे, यासाठी जिल्ह्याच्या खासदार यांनीही प्रयत्न करावेत.
पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विम्याचा नवा पॅटर्न निर्माण केला. राज्यातील इतर जिल्ह्यातही तो लागू केला जाणार आहे. काही वर्षांपूर्वी कोणतीही पीक विमा कंपनी जिल्ह्यात येण्यास तयार नसताना नवीन पीक विमा योजना लागू केली गेली व हा पीक विमा पॅटर्न देशाच्या इतिहासात महत्त्वाचा ठरताना सोयाबीनसारख्या पिकाच्या नुकसानीमुळे 25 टक्के पीक विमा अग्रीम शेतकऱ्यांना दिले गेले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या स्थितीत ही मदत महत्त्वाची ठरली. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला आहे.
यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझा गाव सुंदर गाव या अभियान पुस्तिकेचे अनावरण व संदेश वाचन करण्यात आले. संदेश वाचनामधून पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी 15 एप्रिल 2022 पासून अडीच महिने जिल्ह्यात हे अभियान चालणार असून या कालावधीत चांगले काम करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर देखील गुणवत्तेच्या आधारे सर्वोत्कृष्ट तीन ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात येईल, असे सांगितले.
राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठीच्या योजनांना ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देऊ. सामाजिक व पायाभूत विकासासाठी निधी दिला जाईल. शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी योजना राबविताना प्रत्येक गावाला बंद नळातून पाणी देण्यात येईल, यासाठी वॉटर ग्रीड तयार करण्यात येत आहे. सध्याच्या जिल्हा परिषद सदस्य सभागृह सदस्यांची मुदत संपत असून बीड जिल्हा परिषदेवर दिनांक 21 पासून प्रशासक कार्यरत असतील. त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे पुढे चालू ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
या क्षणाची बऱ्याच दिवसापासून वाट पाहण्यात होतो. परंतु, कार्यकाळ संपत असताना हा शेवटचा दिवस गोड झाला, याबद्दल समाधान व्यक्त करून जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या शिरसाट म्हणाल्या, जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, बीड आदि पंचायत समितींच्या नवीन इमारती झालेल्या आहेत. विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना भरघोस निधी प्राप्त झाला आहे, असे सांगितले
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीबरोबरच पंचायत समितीसाठी देखील नवी इमारत पूर्ण झाली आहे. यासह नवीन विश्रामगृह इमारतीसाठी मंजुरी देण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात महिलांसाठी दोनशे खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे, ही आनंदाची बाब आहे. राज्य शासनाने बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 211 च्या सौंदर्यीकरण पोल शिफ्टिंग या कामांसाठी देखील वीस कोटी रुपये मंजूर केले आहेत, ही बीड शहर विकास साठी मोठी गोष्ट आहे, असे ते म्हणाले.
आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले, जिल्ह्यात चांगल्या विकासकामांसाठी सर्वांचे सहकार्य मिळत असून पूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले असल्याने आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे.
आमदार प्रकाश सोळंके म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधून सामान्यांची कामे होतात. येथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची यापूर्वीच संधी मिळाली. आजच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याबरोबरच अनेक महापुरुषांचे पुतळ्यांचे भूमिपूजन झाले. त्यांच्या कार्याचे स्मरण विकास कामांमधून व्हावे.
आमदार विनायक मेटे म्हणाले, ग्रामीण भागाशी संबंध असलेले जिल्हा परिषद हे जणू मिनी मंत्रालयाचा असून महापुरुषांच्या कामाची प्रेरणा घेऊन जनतेचे कामे गतीने करणारा कारभार व्हावा.
*चौकट :*
जिल्हा परिषदेच्या नवीन इमारत प्रांगणामध्ये छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांसह लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, स्व. बाळासाहेब ठाकरे , स्वर्गीय सुंदरराव सोळंके , स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर या महापुरुष व लोकनेत्यांचे पुतळे उभारण्यात येणार असून त्यांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. मुंडे, राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले.
यानंतर समारंभस्थळी आगमन झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले .यावेळी पोद्दार इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नवीन इमारत लोकार्पण कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ शाल देऊन जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकार्यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती जयसिंग सोळंके , कृषी व पशुसंवर्धन सभापती सविता बाळासाहेब मस्के , महिला व बाल कल्याण सभापती यशोदा बाबुराव जाधव, समाज कल्याण सभापती कल्याण आबूज यासह माजी आमदार सलीम सय्यद, पृथ्वीराज साठे , साहेबराव दरेकर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके , बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पोपटराव जोगदंड यासह शिवसेना जिल्हाप्रमुखअनिल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. राजेश्वर चव्हाण, रेखाताई क्षीरसागर, सतीश शिंदे , अजय मुंडे, नारायण शिंदे यासह जिल्हा परिषदेचे सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सोळंके यांनी केले. आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी केले तर राहुल गिरी यांनी सूत्रसंचालन केले.