प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबारानंतर शहरात खळबळ उडाली होती. यानंतर काल रात्री डॉ. भारतभुषण क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आज सकाळी आमदार संदिप क्षीरसागर यांचे वडील रविंद्र क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अर्जन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी, आनंद पवार, गणेश भरनाळे, अशोक रोमण यांच्यावर प्राणघातक हल्ला व दरोड्याचा गुन्हा शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून आम्ही जागा खरेदी करत असताना, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालय येथे वरील सर्व मंडळी आली व त्यांनी रजिस्ट्री का करता म्हणून मारहाण केली व कुकरीने जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यासह जवळ असलेले नगदी रुपये लंपास केले असल्याची फिर्याद सतीश पवार यांची बहिणी प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन शिवाजी नगर पोलीसत गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.