बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानाचा होणार कायापालट; पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांचा पुढाकार
पूर्वी सुरू असलेल्या 11 कोटींच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार; त्वरित चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करण्याचे ग्रामविकासमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानचा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून व शिवा, अखिल भारतीय वीरशैव संघटनेच्या मागणी व पाठपुराव्यानुसार कायापालट होणार आहे.
येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा निर्माण करणे व पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा विकास आराखडा तातडीने तयार करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज झालेल्या मुंबईत त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले .
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंबंधी बैठक पार पडली, या बैठकीस ना. मुश्रीफ यांच्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, शिवा संघटनेचे अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे तसेच ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी व शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कपिलधार येथील मंदिरातील दर्शन रांग सुरळीत व्हावी, यासाठी बाजूच्या डोंगराची कडा कापून दर्शन रांग विकसित करण्यात यावी, या बाबीचा समावेश देखील नव्या आराखड्यात करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या.
*मागील 11.26 कोटींच्या निकृष्ट कामाची होणार चौकशी*
मागील सरकारच्या काळात कपिलधार येथील विकासकामांसाठी ग्रामविकास विभागाने 11.26 कोटी रुपये निधी दिला होता, परंतु संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शिवा संघटनेने केली होती.
या तक्रारीची दखल घेत हे काम करणाऱ्या कंत्राटदार व अन्य संबंधितांची तात्काळ चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. याशिवाय जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत त्यात मागणीनुसार बदल करण्याच्या सूचना ही करण्यात आल्या.
दरम्यान श्री. मन्मथ स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या व डोंगर दऱ्यातील नयनरम्य पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कपिलधार देवस्थानाच्या विकासासाठी पुढाकार घेऊन सर्व मागण्या मान्य केल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ. संदीप क्षीरसागर व शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.