पहिले चक्का जाम नंतर मोर्चा
मराठा आरक्षण, पिक कर्ज, ऊतसोड मजुरांचे प्रश्न, आरोग्य कंत्राटी कर्मचारी यासह इतर प्रश्नांसाठी सोमवारी बीड मध्ये मोर्चा
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मराठा समाजाच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. यातील मुख्य मागणी म्हणजे मराठा आरक्षणाची मागणी या मागणीसाठी सध्या राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत आहे. त्यात परत बीड मध्ये सुद्धा मराठा आरक्षण व इतर प्रश्नांसाठी सोमवारी (ता. 28) मोर्चा काढण्यात येणार असल्यांची माहिती आज शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी दिली. मोर्चाला परवानगी मिळो किंवा न मिळो तरीपण सोमवारचा मोर्चा निघणार असल्याचे मत यावेळी आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले. यासह पहिले चक्का जाम आंदोलन व नंतर 28 ला मोर्चा काढू असे त्यांनी यावेळी सांगितले. यासह पालकमंत्री यांच्या कामाबाबत सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मराठा आरक्षणासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत असताना आता परत बीड मध्ये सुद्धा मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांना तातडीने पिक कर्ज देण्यात यावेत, पिक विम्याच्या पॅटर्न उलटा चाललाय, यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, ऊतसोड मजुर, मुकादम यांच्यासाठी कायदा करावा, 66% भाववाढ देण्यात याव, कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना पात्र करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शहरात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज हा लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. परंतु आज पर्यंत मराठा समाजाला यश आलेले नाही. यामुळे मराठा समाजातील युवकांचे यात मोठे नुकसान होत आहे. यासह इतरही समस्यांचा सामना मराठा समाजाला करावा लागत आहे. यासह जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचे सुद्धा अनेक प्रश्न प्रलंबित आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यांच्या अडचणी दुर करुन त्यांना तात्काळ पिक कर्ज देण्यात यावे, ज्यांनी कोरोनाच्या काळात आपला जिव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केल्या त्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत घेण्यात यावे, पिक विमा बीड पॅटर्न उलटा चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात येणार आहे.
धसांनी मराठा आरक्षणाचा विषय घेतला मनावर
सध्या राज्यातील मराठा समाज विविध समस्यातुन जात आहे. त्यात कोरोनाचे संकट यामुळे तर सर्व ठिकाणी अनेक उद्योग धंदे ठप्प झालेले आहेत. त्यात मराठवाड्यातील मराठा समाजातील परिस्थिती खुपच हालाकिची बनली आहे. याच अनुषंगाने आमदार सुरेश धस यांनी मराठा आरक्षणासह इतर महत्वांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधणेसाठी मोर्चाची हाक दिली आहे. सोमवारी काढण्यात येणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहान त्यांनी केले आहे.
पहिले चक्का जाम आंदोलन नंतर मोर्चा
ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी 26 जुनला राज्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. यात आंदोलनात आम्ही सहभागी होऊन चक्का जाम आंदोलन करणार व नंतर 28 ला मोर्चा काढणार असल्याचे मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले. बीड शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदे मध्ये आमदार सुरेश यांनी विविध विषयांना हात घालत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मत व्यक्त केले.