मतदारांना धमकावल्या प्रकरणी भाजपा उमेदवाराविरुद्ध आयोगाकडे तक्रार दाखल
गेवराई प्रतिनिधी : गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीतील प्रचाराच्या पहिल्याच टप्यात भाजपा उमेदवाराला मतदारांकडुन प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत, अशा परिस्थितीत सर्वसामान्य, गरीब मायक्रो ओबीसी मतदारांना जाहिरपणे दमदाटी करुन झोडपुन काढण्याची भाषा भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांच्याकडुन केली जात आहे. एकीकडे खुनाच्या गंभीर आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगुन आलेले त्यांचे पती कारागृहातुन गेवराईचा कारभार हाकत असल्याच्या कहाण्या जाहिर भाषणात सांगत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या पत्नी मतदारांना धमकावत आहेत ही बिहार ची निवडणुक आहे की गेवराई नगर परिषदेची ? असा प्रश्न मतदारांना पडला आहे. परंतू बहाद्दर मतदार गेवराई शहराचा बिहार होवु देणार नाहीत असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे यांनी व्यक्त केला. त्यांनी या प्रकरणी निवडणुक आयोगाकडे तक्रार देवुन कारवाईची मागणी केली आहे.
गेवराई नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार सौ. गीता त्रिंबक उर्फ बाळराजे पवार यांनी प्रचार फेरी दरम्यान दाभाडे गल्ली येथील मायक्रो ओबीसी कुटूंबातील गरीब मतदाराला जाहिररित्या धमकावल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांमध्ये गाजत आहे.ङ्ग काही वळवळ केली तर माझे इतके वाईट नाही, एकेकाला झोडपुन काढीन, घरकुलाचे दोन्ही हाप्ते टाकलेत, बिलकुल विसरायचे नाही, रिकामी वळवळ करायची नाही.ङ्घ असे सौ. गीता पवार यांचेकडुन मतदारांना धमकावत असल्याचे व्हायरल व्हिडीओ क्लिप मध्ये स्पष्ट दिसत आहे. या पुर्वीही भाजपा उमेदवार आणि त्यांच्या कुटूंबीयांकडुन मतदारांना धमकावण्याचे प्रकार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत होत्या मात्र गोर-गरीब असाह्य मतदार त्यांच्या दहशतीमुळे लेखी तक्रार देण्यास धजावत नाहीत. या व्हिडीओ सह लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शितलताई महेश दाभाडे यांनी आज निवडणुक निर्णय अधिकारी व निवडणुक आयोगाकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीमुळे गेवराई शहरात खळबळ उडाली असुन भाजपाचा विशेषत: पवार कुटूंबाचा गुन्हेगारी चेहरा या निमित्ताने जनतेसमोर आला आहे.
तक्रार अर्जात नमुद केले आहे की, भाजपा उमेदवार सौ. गीता पवार यांचे दिर अॅड. लक्ष्मण पवार हे दहा वर्ष भाजपा कडुन गेवराईचे आमदार राहिले आहेत, त्यांचे पती त्रिंबक उर्फ बाळराजे पवार हे खुनाच्या गंभीर आरोपात दोषसिद्धी नंतर चौदा वर्ष कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगुन आलेले आहेत. बिहार मध्ये ज्या पद्धतीने बाहुबली राजकीय कुटूंबाचा उल्लेख होता अगदी तिच प्रतिमा गेवराई शहरात या कुटूंबाबद्दल आहे. त्यांच्या दहशतीमुळे सामान्य लोक लेखी तक्रार देण्यास घाबरतात. स्वत: उमेदवार सौ. गीता पवार मतदारांना धमकावत असतांना सिसिटीव्ही मधील व्हिडीओ मध्ये दिसुन आले आहे. ज्यांना धमकावले गेले ते कुटूंब प्रचंड दहशतीखाली असुन प्रत्यक्ष तक्रार देण्यास ते धजावत नाहीत, भितीपोटी ते गेवराई शहर सोडुन जाण्याच्या मनस्थितीत आहेत, एका सामान्य मायक्रो ओबीसी कुटूंबावर ही वेळ पवारांच्या दहशतीमुळे आली असल्याचा आरोप सौ. शितलताई दाभाडे यांनी केला आहे. अनेक वर्ष जेलमध्ये राहिलेली व्यक्ती आपण जेलमधुन कशी कामे केली हे जाहिरपणे सांगत आहेत. अनेकांना फोनवरुन त्यांचेकडुन धमकावले जात आहे, त्यामुळे गेवराई नगर परिषदेची निवडणुक पारदर्शक, भयमुक्त व शांततेत होणार नाही अशी सर्वसामान्य जनतेची धारणा झाली असल्यामुळे तात्काळ या बाबत निवडणुक आयोग आणि पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या उमेदवार सौ. शितलताई दाभाडे यांनी केली आहे. या बाबतची लेखी तक्रार त्यांनी निवडणुक निर्णय अधिकार्याकडे केली आहे.

















