बीड प्रतिनिधी ः- गेली तीन दिवस उमेदवाराच्या निवडीबद्दल वैचारीक, सामाजिक व राजकीय अभिसरण साधले जात असताना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार कोण ? या प्रश्नाचे उत्तर काल समोर आले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी दलित मित्र माजी जिल्हा परिषद सदस्य मनोजरराव वंजारे यांच्या कन्या निवृत्त नायब तहसिलदार प्रेमलता पारवे यांची उमेदवारी जाहिर केली. सोबतच शिवसेना व शिवसंग्राम यांना सोबत घेत असल्याचे जाहिर करताना सक्षम राजकीय पर्याय देत असल्याचे माध्यमांना सांगितले.
आमच्याकडे भाजपचा देखील प्रस्ताव होता मात्र मतदारांच्या समोर मते मागताना प्रामाणिकता आणि सक्षम मित्र असेल तरच आम्ही निवडून येऊ शकतो असा आमचा विश्वास आहे. अशाप्रकारे आम्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आणि त्यांच्या आदेशाने राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासोबत जाण्याचे नक्की केले असे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगतापयांनी पत्रकारांना सांगितले.
स्व.लोकनेते विनायकराव मेटे साहेबांनी क्षीरसागरांच्या हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाहीत लढा दिला. शहर क्षीरसागरांनी अळीपाळीने लुटून खाल्ले, आता मात्र आम्ही असे होवू देणार नाही. राष्ट्रवादी सोबत खांद्याला खांदा लावून निवडणुक लढवणार आणि जिंकणार असे शिवसंग्रमचे राज्यकार्यवाह प्रभाकर कोलंगडे यांनी म्हटले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, शिवसंग्रामचे राज्य कार्यवाह प्रभाकर कोलंगडे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, पक्षाचे निरीक्षक माजी आमदार संजय दौंड, युवकचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे शेख निजाम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, शिवसंग्रामचे जिल्हा कार्यवाह सुहास पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र राऊत, माजी नगरसेवक फारुक पटेल, विनोद मुळूक, विलास विधाते, शेख मुजीब, माध्यम प्रमुख भागवत तावरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, नगरसेवक पदाचे ५२ उमेदवार व राष्ट्रवादी, शिवसेना व शिवसंग्राम पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()

















