पक्षप्रवेशानंतर जिल्ह्यात शिवसेना जोमाने वाढविण्याचे ठाकरेंचे खांडे यांना आदेश, बीडचे राजकिय गणित बदलणार
मुंबई: पंचविस वर्षांपुर्वी कुंडलिक खांडे यांनी शिवसेनेतून राजकारणाला सुरूवात केली. मध्यल्या काळात ते शिवसेनेपासून दूर होते. परंतु पुन्हा त्यांनी शिवसेना पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दि.११ नोव्हेंबर रोजी मुंबईत मातोश्रीवर जावून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून बीड जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याची जबाबदारीही सोपविली. दरम्यान, कुंडलिक खांडे यांच्या प्रवेशाने जिल्ह्यातील राजकारण बदलणार आहे.
यावेळी विरोधी पक्ष नेते आ.अंबादास दानवे, सुभाष देसाई, जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, माजी जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. कुंडलिक खांडे यांच्या शिवसेना प्रवेशाने बीड जिल्ह्यातील राजकारणाचे गणित बदलणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सरपंच-उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मंगळवार दि.११ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील मातोश्री बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. खांडे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे बीड विधानसभा मतदारसंघ तसेच बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच बदलणार आहे. पक्षप्रवेशावेळी उध्दव ठाकरे म्हणाले, आपण गोपीनाथ मुंडे यांच्यावरील प्रेमापोटी आतापर्यंत बीड जिल्ह्यात भाजपला झुकते माप दिले. पण आता बीड जिल्ह्याची पूर्णत: विल्हेवाट लागली आहे. तिकडे कुणीच कुणाचे नाही. अशावेळी सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. जनतेकडूनही आपल्याला मोठी अपेक्षा आहे. शिवसेना मला पूर्वीपेक्षा जास्त वैभवशाली पाहिजेच. याचा अर्थ जनता आपल्यासोबत आली पाहिजे. त्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. यावेळी कुंडलिक खांडे यांनी आपण राजकारणाची सुरूवातच शिवसेनेतून केलेली असून आता आयुष्यभर शिवसैनिक म्हणून काम करू, जिल्ह्यात शिवसेना वाढवून दाखवू, असा शब्दही त्यांनी यावेळी ठाकरेंना दिला. खांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
अशी कुंडलिक खांडे यांची राजकिय वाटचाल
१) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट हिंदुत्ववादी विचारांनी भारावून जात वयाच्या १६ वर्षी एक शिवसैनिक म्हणून सक्रिय समाजकारणाला प्रारंभ करणाऱ्या कुंडलिक खांडे यांनी सन २०१७ साली पहिल्यांदा शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी स्विकारली होती.
२) २०२२ मध्ये शिवसेनेत पडलेल्या फुटी दरम्यान खांडे हे शिंदे सेनेत दाखल झाले होते. मात्र वारंवार होणाऱ्या राजकिय अन्यायामुळे त्यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्या अगोदर पंचायत समिती सदस्य म्हणून ही त्यांनी पाच वर्ष ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले.
युवा वर्गात आहे कायम क्रेझ
आजच्या युवा पिढीला दिशा आणि प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व म्हणून कुंडलिक खांडे यांच्याकडे बघितले जाते. सामाजिक कार्य, संवादकौशल्य आणि लोकांशी असलेला थेट संवाद या गुणांमुळे ते युवकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवक सामाजिक चळवळीत सहभागी होत आहेत. रोजगार, शिक्षण आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांमध्ये त्यांनी उचललेले प्रश्न थेट युवकांच्या जीवनाशी जोडलेले आहेत.














