बीड :- नागरिकांच्या शासकीय कामातील अडचणी सोडवण्यासाठी आणि सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यसाठी प्रशासकीय विभागांसोबत बीड तालुक्यातील चौसाळा जिल्हा परिषद गटातील गावांची वानगाव येथे मंगळवारी (दि.२४) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी ‘आमदार आपल्या दारी’ या विशेष मोहीमेअंतर्गत बैठक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्थानिक नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यावर भर देण्यात आला.या कार्यक्रमादरम्यान, श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेच्या मंजूरी पत्रांचेही प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात आ.संदीप क्षीरसागर यांनी चौसाळा जिल्हा परिषद गटातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि तात्काळ निराकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ‘आमदार आपल्या दारी’ ही संकल्पना गावागावांतील लोकांच्या समस्या थेट त्यांच्या दारी जाऊन सोडवण्यासाठी आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी असून शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवणे आणि प्रशासकीय प्रक्रियांमधील अडथळे दूर करणे हा आमचा मुख्य उद्देश असल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले. या उपक्रमाला चौसाळा जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अशा प्रकारच्या मोहिमांमुळे शासकीय योजनांचा लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम यांच्यासह तहसीलदार आणि तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी, पंचायत समिती, महावितरण, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग आदी प्रशासकीय विभागांचे अधिकारी व चौसाळा जिल्हा परिषद गटातील गावांमधील नागरिक उपस्थित होते.