भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संयुक्त जयंती उत्सव समितीचा निर्णय
बीड प्रतिनिधी :- भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक डॉ.अनिरूद्ध वनकर यांचा कार्यक्रम दि.२५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यु झालेला आहे. याचा दुखवटाम्हणून जयंती उत्सव समितीकडून भीमगीतांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून अखंडितपणे साजरी केली जाते. याहीवर्षी आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२५ एप्रिल २०२५ रोजी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक डॉ.अनिरूध्द वनकर यांचा भीमगीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतातील विविध भागांतून पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले. ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्यामुळे बीड येथील भीमगीतांचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संयुक्त जयंती उत्सव समितीकडून घेण्यात आला आहे. याबाबत जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड.सिध्दार्थ शिंदे यांच्याकडून माहीती देण्यात आली आहे.