प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : सध्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये सर्व व्यवसाय ठप्प असले तरीही शेतकरी राजा आपल्या शेतामध्ये काम करताना दिसून येत आहे. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे उन्हाळी पिक सुद्धा जोमात आले असून त्याची काढणी करताना गेवराई तालुक्यातील सिरसदेवी या ठिकाणी महिला वर्ग उन्हाळी ज्वारीचे पिक काढणी करताना दिसत आहे.
लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग ठप्प झाले होते. मोठ्या शहरातील नोकरदार मंडळीसुद्धा ग्रामीण भागाकडे आली होती. छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले होते परंतु एकमेव असा व्यवसाय म्हणजे शेती हा व्यवसाय लॉकडाऊनमध्ये सुरू होता. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात सुद्धा शेतकरी जास्त असून पाऊस जर जोमात झाला तर या वर्गाला बऱ्यापैकी दिलासा मिळतो. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिक सुद्धा घेतले असून त्याचे उत्पन्न चांगल्यापैकी आले आहे. गेवराई तालुक्यातील व जिल्हाभरातील उन्हाळी पीक काढणी सुरू असून शेतकरी वर्ग हा या कामात गुंतलेला दिसत असून त्याला या पिकाचा फायदा होताना दिसत आहे.