मारहाण प्रकरणात स्थानिक न्यायालयाने दिली होती दीड वर्षाची शिक्षा
बीड प्रतिनिधी : पंचायत समिती सभापती निवडणुकीच्या वादातून झालेल्या भांडणात बेलूर येथील पांडुरंग गवते आणि इतरांना मारहाण केली म्हणून बीडच्या स्थानिक न्यायालयाने बबन गवते आणि बळीराम गवते यांना दीड वर्षाची शिक्षा सुनावली होती, या प्रकरणात गवते पितापुत्रांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाने या प्रकरणातील गवते पितापुत्रांचे अपील दाखल करून घेतले असून दोघांनाही जामीन दिला आहे.
बीड पंचायत समिती सभापतींच्या निवडणुकीदरम्यान बेलूर ता. बीड येथील पांडुरंग गवते आणि बबन गवते या दोन गटात हाणामारी झाली होती. या प्रकरणात पांडुरंग गवते यांच्या फिर्यादीवरून बबन गवते, बळीराम गवते व इतरांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास बीड ग्रामीण पोलिसांनी करून बीडच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी गवते पितापुत्रांना दीड वर्षाची कैद आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. गवते पितापुत्रांनी तात्काळ या षीकेशेंला आव्हान देणारे अपील बीडच्या सत्र न्यायालयात दाखल केले. यात न्यायालयाने बबन गवते, बळीराम गवते आणि इतरांना जामीन मंजूर केला आहे. आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून अपिलात आपल्याला नक्की न्याय मिळेल असे बबन गवते यांनी म्हटले आहे.