बीड प्रतिनिधी :- पाण्याचा स्त्रोत आणि अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणा सज्ज असूनही केवळ या योजनेस, नगरपालिकेकडे महावितरण विभागाची ३६ कोटी रुपये थकबाकी असल्याने वीज कनेक्शन मिळत नाही. आणि त्यामुळे बीड शहराला १५ दिवसाला पाणी येत आहे. या विषयात आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी कोर्टात धाव घेतली आणि आता मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीजेची थकबाकी भरून योजनेस वीजजोडणी करून बीड शहरात पाणीपुरवठा सुरळीत करा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी केली आहे.
सध्या बीड शहराची लोकसंख्या अंदाजे ३ लाख आहे. बीड शहराला सध्या माजलगाव धरणातून पाणीपुरवठा होत आहे. त्याची क्षमता २४ एमएलटी आहे. यासोबतच बिंदुसरा धरणातून ६ एमएलटी पुरवठा होत आहे. सध्या बिंदुसरा धरणाची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे बीड शहराला माजलगाव बॅकवॉटर मधून पाणीपुरवठा होत आहे. बीड शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेत दि.२९ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या कार्यारंभ आदेशानुसार अमृत पाणीपुरवठा योजना सुरू केली असून तीची क्षमता 25 एमएलटी इतकी आहे. या योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण आहे आणि उर्वरित ५ टक्के कामही सुरू आहे. परंतु नगरपरिषदेकडे महावितरणचे ३६ कोटी रूपये वीजबिल थकबाकी आहे. त्यामुळे या योजनेला नवीन कनेक्शन मिळत नाही. सदरील योजनेचे सर्व काम आणि यंत्रणा तयार असूनही केवळ वीज कनेक्शन अभावी बीड शहराला १५ दिवसाला पाणी मिळत आहे. यबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी वारंवार अधिवेशनात, शासनस्तरावर पाठपुरावा केला अनेक प्रयत्न केले परंतु यावर काहीच उपाय न झाल्याने शेवटी, आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार जनहित याचिका नंबर 21 ऑफ 2024 वर निर्णय देताना, खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.11 जुन 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव नगर विकास विभाग यांना, सदर विषय गंभीर असून मा.अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास यांनी मा.जिल्हाधिकारी व महावितरणचे अधिकारी व संबंधित अधिकारी यांचे बैठक घेवून वीज बील भरणेसंदर्भात ताबडतोब उपाय योजना करून तात्काळ पाणी पुरवठा योजना सुरू करून बीड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे आदेश दिले आहे. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर आणि माजी आ.सय्यद सलीम यांनी मा.न्यायालयच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून बीड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.