ज्ञानराधावर माजलगावमध्ये दोन गुन्हे नोंद
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : एकीकडे ज्ञानराधाने 21 मे पासून ठेवीदारांच्या ठेवी वापस देण्याचं आश्वासन शुक्रवारी गेलेल्या शिष्टमंडळाला दिले आहे तर दुसरीकडे आज शनिवारी ज्ञानराधावर माजलगावमध्ये दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहे. यामध्ये एका गुन्ह्यात 3 लाख 80 रुपयांची फसवणूक तर दुसऱ्या गुन्ह्यात 1 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा नोंद झाल्यामुळे सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या असल्याचे दिसत आहे.
गेल्या सात महिन्यांपासून ज्ञानराधामध्ये जवळपास 2400 कोटींच्या ठेवी अडकल्या लाखो ठेवीदारांच्या ठेवी असून हे ठेवीदार गेल्या सात महिन्यांपासून ठेवी परत मिळतील या आशेवर आहेत. यामध्ये 21 मे ला तुमच्या ठेवी मिळण्यास सुरुवात होईल असे आश्वासन शुक्रवारी सुरेश कुटे व ठेवीदारांमध्ये झालेल्या बैठकीत सुरेश कुटेंनी दिले. 21 मे पैसे मिळतील अशी आशा ठेवीदारांना असली तरी दुसरीकडे मात्र सुरेश कुटेंवर आता गुन्हे नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी माजलगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये सुरेश कुटे यांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेवीदारांनी वेगवेगळे दोन गुन्हे नोंद केले आहेत. यामध्ये तीन लाख 80 हजार रुपये हा पहिला गुन्हा तर दुसऱ्या गुन्ह्यात एक लाख 10 हजार रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी दुसरा गुन्हा माजलगाव पोलीसात नोंद झाला आहे. हे दोन्ही गुन्हे नोंद झाल्यामुळे सुरेश कुटे यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.