Beed : पायाला भिंगरी लावून नवलेंनी मतदारसंघ पिंजून काढला
देशामध्ये सध्या विपरीत परिस्थिती निर्माण होत आहे. जाती-जाती आणि धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे देशामध्ये जातीय सलोखा आणि धार्मिक ऐक्य राखण्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडून द्यावे असे आवाहन प्रा.सुरेश नवले यांनी केले आहे. बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारसभेच्या ठिकाणी प्रा.सुरेश नवले बोलत होते. संपूर्ण बीड शहर आणि परिसर प्रा.नवले यांनी पिंजून काढला असून गल्ली गल्ली आणि वाडी, तांडा, वस्त्यांवर त्यांच्या प्रचार बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बीड शहरातील विविध भागांमध्ये बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठका संपन्न होत आहेत. प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे पारडे आता जड झाले आहे. प्रा.नवले यांनी देखील प्रचार यंत्रणा आपल्या हातात घेतली असून सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत पायाला भिंगरी लावून प्रा.नवले बजरंग सोनवणे यांचा प्रचार करत आहेत. गुरुवारी शहर आणि परिसरात सोनवणे यांच्या प्रचारार्थ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा.नवले म्हणाले, देशामध्ये जातीय सलोख्याची गरज आहे. देशामध्ये धार्मिक ऐक्याचीही गरज आहे. हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, जैन हे सर्व धर्मबांधव या देशामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हेच ऐक्या काही लोकांना आणि पक्षांना खूपत आहे. धर्म आणि जाती-जातीमध्ये मतभेदाच्या भिंती उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वसामान्य जनता देखील अशा दुतोंडी मांडुळांच्या भूलथापांना बळी पडत आहे. हे सर्व प्रकार करून स्वार्थी लोक त्यावर आपले राजकारण साधायचे उद्योग करत आहेत. या त्यांच्या प्रयत्नांना मुठमाती देवून हा देश एकसंध राहिला पाहिजे, असेही नवले यावेळी म्हणाले. या देशासाठी सर्व तरुणांनी आणि सुजान मतदारांनी आता जागं झालं पाहिजे. आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी देशाला तोडणार्या शक्तीच्या विरोधात एकजुटीने उभं राहिलं पाहिजे कारण या देशाची एकात्मता सर्वांत मोठी आहे. या एकात्मतेसाठी अनेकांनी आपले प्राण दिलेले आहेत, हे विसरता कामा नये. त्यामुळे या ऐक्यासाठी बीडमधून सर्वांनी बजरंग सोनवणे यांना निवडून द्यावे कारण हेच खर्या अर्थाने देशकार्य असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रा.नवले यांनी केले.