इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचे खुले आव्हान
बीड : मला मिळालेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याचे यश आहे. पालकमंत्र्यांनी कुणब्याच्या पोराचे जातीचे प्रमाणपत्र भर सभेत दाखवून अपमान केला. त्यांनी स्वतः व दोन्ही ताईंनी केलेल्या विकास कामाचे कागदपत्रे दाखवली पाहिजेत. असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केली आहे.
बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप व महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना पालकमंत्र्यांनी शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांचे कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र भर सभेत दाखवून त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. या टिकेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, या राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी भर सभेत कुणबी जातीचे प्रमाणपत्र दाखवून मराठा व कुणबी मराठ्यांचा अपमान केलेला आहे. मला मिळालेले कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र हे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याचे यश आहे. आजी – माजी पालकमंत्र्यांनी माझे कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र सभेत दाखविण्याऐवजी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची कागदपत्रे दाखवायला हवी होती. मी जन्माने कुणबी मराठा आहे, मात्र खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एका माळी समाजाच्या व्यक्तीला निवडून आणून न्याय दिला. कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावरून राजकारण करणे हे चुकीचे आहे. असे ही ते म्हणाले.
बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांवर टीकेची झोड उठवून आरोप – प्रत्यारोपणाने वातावरण तापले आहे. जनतेचे विकास कामाच्या मुद्द्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करून मनोरंजन केले जात आहे. तर सत्ताधारी खासदारांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात विकास निधी खर्च न केल्याने निधी परत गेल्याच्या मुद्द्याला धरून बजरंग सोनवणे यांचा विरोधकांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जनता विकासाच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.