ठिकठिकाणी स्वागत, साध्या पध्द्तीने उमेदवारी अर्ज दाखल करणार
बीड / केज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे शहरातील व तालुक्यातील तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बीडकडे रवाना झाले. आज सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसच्या नेत्या खा. रजनीताई पाटील , शिवसेनेचे किशोर पोतदार व इंडिया आघाडीच्या निवडक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या मातोश्री व अर्धागिनी यांनी औक्षण केल्यानंतर ते आपल्या आई – वडिलांचे आशीर्वाद घेऊन पवनसुत निवासस्थानातून बाहेर पडले. त्यांनी शहरातील महादेव मंदिर, स्वामी समर्थ मठ, दर्गाचे दर्शन घेवून कुंबेफळ येथील श्री सिद्धी विनायक मंदिर व दर्गाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे जन्मस्थळ सारणी (आ.) येथील हनुमान मंदिरात हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर आनंदगाव (सा.) येथे खंडोबाचे दर्शन घेऊन रामवाडगाव येथे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन सोनेसांगवी, गोटेगाव, माळेगाव, साळेगाव चिंचोली (माळी) मार्गे हनुमंत पिंप्रीकडे रवाना झाले. त्यांनी उत्तरेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन चाकरवाडी येथील ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर बजरंग सोनवणे हे बीडकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, बीड शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शहरातील प्रसिद्ध दर्गा आणि धार्मिक स्थळांना भेट देवून दर्शन घेत बीड येथे राष्ट्रवादी भवनातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसच्या नेत्या खासदार रजनीताई पाटील, शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार यांच्यासह इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते यांच्यासह निवडक कार्यकर्त्या समवेत अत्यंत साध्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जावून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जयंत पाटील, खा. रजनीताई पाटील, किशोर पोतदार हे राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
जन्मगावी भव्य स्वागत
शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांच्या जन्मगावी सारणी (आनंदगाव) येथे सर्व गावकऱ्यांनी त्यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करीत ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली. यावेळी महिलांनी औक्षण केले. त्याचबरोबर या मार्गावरील गावात त्यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
शेतकऱ्याची शेतकरी पुत्राला मदत
बजरंग बप्पा सोनवणे हे चाकरवाडी येथे ज्ञानेशवर माऊली यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आले असता बाळासाहेब पवार या शेतकऱ्यांनी शेतकरी पुत्र सोनवणे यांना निवडणूक लढण्यासाठी ५ हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला.