वारे कायदा! सर्वसामान्यांना एक कायदा व सत्ताधाऱ्यांना एक
दहा दिवस होवूनही उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाटच
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्था फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का? असा प्रश्न वारंवार समोर येतो. गेल्या दहा दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणामध्ये 6 एप्रिल 2024 रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह 12 जणांवर 307 चा गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा होवून तब्बल दहा दिवस होत आले तरीही या मारहाण प्रकरणातील सर्वच आरोपी मोकाट असल्यामुळे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच अनुषंगाने सर्वसामान्यांना एक नियम व सत्ताधाऱ्यांना एक नियम आहे काय? असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहे.
शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर 5 एप्रिल 2024 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. यामध्ये ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हाप्रमुख कुंडलिक उर्फ बापू हरीभाऊ खांडे, गणेश हरीभाऊ खांडे, नामदेव हरीभाऊ खांडे, गोरख उर्फ पप्पू शिंदे, बाबारतन पाटोळे, सुनिल पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला दुनघव सर्व रा.म्हाळसजवळा व इतर अनोळखी चार जणांवर ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून कलम 307, 336, 324, 141, 120 ब, 143, 147, 148, 149, 504, 506 भादंविनुसार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 6 एप्रिल 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाला दहा दिवस होवूनसुद्धा यातील एकाही आरोपीला पोलीसांनी आजपर्यंत ताब्यात घेतलेले नाही. यामुळे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.