-आरोग्य विभाग व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई
-दोन आरोपी जेरबंद; मुख्य आरोपी डॉ. सतीष गवारे फरार
-डमी ग्राहक पाठवून पोलीसांनी केले स्टिंग
-गेवराई शहरातील महत्वांच्या ठिकाणी सुरु होता सर्व प्रकार
गेवराई/बीड : गेवराई शहरातील संजय नगर परिसरात एका घरात अवैध गर्भपात केले जात असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे यांना प्राप्त झाली होती. यांनतर सीएस डॉ. अशोक बडे यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर आज (ता. 04) सकाळी आरोग्य विभाग व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई केली. यात दोन आरोपींसह गर्भलिंग निदान व गर्भपाताचे साहित्य जप्त करण्यात आले. याकारवाई दरम्यान यातील मुख्य आरोपी डॉ. सतीष गवारे हा मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. या प्रकारणी गेवराई पोलीस ठाण्यात दुपार पर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई सीएस अशोक बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्या टिमने केली.
याबाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराई शहरात संजय नगर परिसरात अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे 29/12/2023 ला प्राप्त झाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी खरोखर असा काही प्रकार सुरू आहे का? या अनुषंगाने जिल्हा प्रशासन काम करत होते. याच प्रकारणी सीएस बडे यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये याच विषयावर सविस्तर चर्चा सुद्धा झाली होती. या प्रकारणाचा पर्दापाश करण्यासाठी आरोग्य विभाग व पोलीस विभाग बुधवार (ता. 03) पासून या कारवाईत होते. अखेर आज सकाळी पोलीस प्रशासनाने डमी ग्राहक पाठवले. गर्भलिंग निदान व गर्भपात याठिकाणी होत असल्याची खात्री झाल्यानंतर याठिकाणी आरोग्य विभाग व पोलीस विभागाने धापा टाकला. परंतू याची चुणचुण मुख्य आरोपी डॉ. सतीष गवारे याला लागल्यामुळे तो फरार होण्यात यशस्वी झाला. परंतू यातील दोन आरोपी महिला मनिषा सानप व घरमालक बबन चंदनशिव याला ताब्यात घेतले. या प्रकारणी दुपार पर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती. सदरची कारवाई बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे, स्थानिक गून्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, वैद्यकीय अधिक्षक मोहम्मद नोमाणी, डॉ रांदड , डॉ राजेश शिंदे आदींनी केली.
यांनी निभावली महत्वाची भुमिका
गेवराई येथील गर्भपात व गर्भलिंग निदान सेंटर आज आरोग्य विभाग व पोलीस विभागाने उदवस्त केले. यात मध्ये आरोग्य विभागाचे सीएस डॉ. अशोक बडे व त्यांच्या टिमचा मोलाचा वाटा आहे. यासह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे व त्यांच्या टिममधील श्री चव्हाण, श्री हांगे, श्री कोरडे, चालक श्री राठोंड यांचा सहभाग होता. यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस व त्यांच्या टिम मधील श्रीमती राऊत, श्रीमती मुळे, श्रीमती खरमाटे, श्रीमती ढाकणे, श्रीमती गोरे, श्रीमती चाटे, श्री बहिर वाहन चालक श्री नेवडे यांचा सहभाग होता. वरील सर्वांनीच या कारवाईसाठी विशेष कार्य केल्यामुळे ही कारवाई यशस्वी झाली.
गर्भपातासाठी घेण्यात येत होते 25 हजार
गेवराई मध्ये गेल्या काही महिन्यापासून अवैद्य गर्भलिंग व गर्भपात होत होते. यांची ऑनलाईन तक्रार सीएस यांच्याकडे 29/12/2023 ला करण्यात आली होती. तक्रार प्राप्त झाल्यापासून आरोग्य विभाग व पोलीस विभाग याची खात्री करत होते. अखेर आज या प्रकरणी कारवाई करण्यात आली. आरोपी डॉ. सतीष गवारे व महिला नर्स मनिषा सानप एका गर्भपातासाठी 25 हजार रुपये घेत होते. बबन चंदनशिव यांच्या घरी हे सर्व सुरु होते.
असा चालत होता गोरखधंदा
बीड जिल्ह्यातील ग्रामिण भागात आज सुद्धा वंशाला दिवा असावा म्हणून मुलांना जास्त पसंती दिली जात आहे. याचाच फायदा काहीजण घेत आहेत. डॉ. सतिष गवारे व नर्स मनिषा सानप हे गेवराई येतील एका घरात गर्भलिंग निदान व गर्भपात करत होते. पुढील ग्राहकांशी फोनवर संपर्क करुन त्यांना गेवराई येथील बसस्थानक परिसरात बोलवण्यात येई, नंतर आरोपी नर्स मनिषा सानप त्यांना दुरवरुन पाहूण खात्री करत असे व नंतर त्यांना त्यांच्या वाहनांने गर्भपात ठिकाणापर्यंत नेण्यात येई. विशेष म्हणजे बसस्थान परिसरातच संबंधितांकडून पैसे घेण्यात येत होते व नंतर त्यांना गर्भपात ठिकाणी नेण्यात येत होते.