तालखेड, टाकरवणसह बाभुळवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे
गेवराई प्रतिनिधी ः- तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बालानाईक तांडा आणि गोंदी खु. या दोन ग्रामपंचायती बिनविरोध निवडून देत मतदारांनी अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला होता. मतमोजणी नंतर गेवराई तालुक्यातील तेरा, माजलगाव तालुक्यातील टाकरवण आणि तालखेड या दोन आणि बीड तालुक्यातील बाभुळवाडी अशा एकुण सोळा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गेवराई मतदार संघातील ग्रामपंचायत निकालावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. ग्रामपंचायत निकालानंतर ग्रामीण भागात विजयसिंह पंडित यांनी मजबुत पकड असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
गेवराई तालुक्यातील बत्तीस ग्रामपंचायतींसाठी रविवार, दि.५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी करण्यात आली. यापैकी गैबीनगर तांडा, बोरगाव थडी, गोपतपिंपळगाव, सेलु, हिंगणगाव, ढालेगाव, कांबी मंजरा, गोळेगाव, सिंदफणा चिंचोली, वाहेगाव आम्ला, औरंगपुर कुकडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार बहुमताने विजयी झाले तर गोंदी खु. आणि बालानाईक तांडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई तालुक्यातील तेरा ग्रामपंचायती मधील सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
उमापूर, राहेरी, भेंड खु., आगरनांदुर, तळवट बोरगाव, पांढरी, रामपूरी व रोहितळ या आठ ग्रामपंचायती शिवसेना (उबाठा) गटाकडे तर पाडळसिंगी, संगमजळगाव, शेकटा, काठोडा आणि चकलांबा या पाच ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीकडे, रेवकी ग्रामपंचायतीवर बीआरएस ने झेंडा फडकविला असून उक्कडपिंप्री ग्रामपंचायत महेश दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या ताब्यात गेली आहे. बेलगाव, कटचिंचोली आणि तांदळा ग्रामपंचायतीवर अपक्षांनी बाजी मारली असून भेंडटाकळी, पिंपळगाव कानडा आणि रसुलाबाद या तीन ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे उमेदवा भाजपा-शिवसेना युतीचे निवडून आले आहेत. एकंदरीत आजच्या निकालावरून गेवराई तालुक्यातील मतदारांनी विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघातील माजलगाव तालुक्यात असलेल्या तालखेड आणि टाकरवन या दोन जिल्हा परिषद गटाच्या गावातील ग्रामतपंचायत निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. बीड तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले, बेलवाडी-बाभुळवाडी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. गेवराई मतदार संघातील एकुण सोळा ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकला असून सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार अमरसिंह पंडित, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी अभिनंदन केले आहे.