बीड:- गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्यांना भेगा पडल्या असुन पत्रे जीर्णावस्थेत आहेत असुन ईमारती धोकादायक असुन पडण्याच्या अवस्थेत असल्याने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी तसेच नविन शाळा बांधकामासाठी निधी देण्यात यावा यासाठी दि.२३ आगस्ट रोजी जिल्हा परिषद कार्यालया समोर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांना “कंदिल भेट”आंदोलन करण्यात आले होते तेव्हा शिक्षणाधिकारी यांनी तातडीने दोन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते.ते आश्वासन हवेतच जिरले असुन काल दि.१९ गुरुवार मध्यरात्री शाळेच्या वर्गखोल्या पडल्या.मध्यरात्री पडल्याने जिवितहानी झाली नाही.आता विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावरच वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत का असा सवाल डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी शिक्षणाधिकारी यांना विचारला आहे.
सविस्तर माहितीस्तव
—
गेवराई तालुक्यातील गेवराई पासुन १५ किलोमीटर अंतरावर १००० पेक्षा जास्त लोकसंख्येच्या राक्षसभुवन रस्त्यावर गंगावाडी गंगावाडी गावाचे ६५ वर्षांपूर्वी पुनवर्सन झाले.१९६४ मध्ये गावात ३ खोल्यांत शाळा सुरू झाली.सध्या पहिली ते आठवी पर्यंत शाळेचे वर्ग असुन १०४ विद्यार्थी आहेत.मुख्याध्यापकासह ६ शिक्षक अध्यापनाचे काम करतात.शाळेच्या वर्गखोल्यांना भेगा पडल्या असुन पत्रे जीर्ण झाले आहेत.त्यामुळे बांधकाम उपविभागाने १३ आक्टोबर २०२१ रोजी दोन खोल्या धोकादायक झाल्याने विद्यार्थी ईतर ठिकाणी बसवावेत व या खोल्यांचा वापर करु नये असे शाळेला कळवले आहे.
गंगावाडी शाळेच्या दुसऱ्या बाजूला एक षटकोनी खोली २००६ मध्ये तयार करण्यात आली असुन या खोलीत २ वर्ग भरतात.वर्गखोल्या नसल्याने ६ वर्ग एकत्रितपणे हनुमान मंदीरात भरविण्यात येत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
गावातील नागरिक शिवाजी नवले यांनी बक्षीसपात्र म्हणून २०१४ मध्ये दोन गुंठे जमीन शाळेला दान दिली आहे.दरम्यान शाळेसाठी अद्यापही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.मागील ५ वर्षांपासून नविन इमारतीसाठी ग्रामस्थ गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या कडे पाठपुरावा करत आहेत मात्र केवळ आश्वासनेच मिळत आहेत.
निदान मुलांच्या शिक्षणासाठी तरी सहानुभूती पुर्वक विचार करुन शाळेसाठी बांधकाम निधी व ईतर सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी दि.२३ आगस्ट रोजी शिक्षणाधिका-यांना कंदिल भेट आंदोलनाद्वारे करण्यात आली होती.मात्र २ महिने उलटुनही कोणतीही उपाययोजना न केल्याने अखेर पडझड झालेल्या शाळेच्या खोल्या पडल्या असुन यामुळे पालकांमध्ये तिव्र नाराजी दिसून येत आहे.