पाटोदा : तालुक्यातील वडझरी येथील संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रमशाळेतील विविध गैरव्यवहार प्रकरणी शालेय पोषण आहार योजनेतील अनियमितता, बोगस पटसंख्या दाखवुन वर्गवाढ करणे आदी गैरव्यवहार प्रकरणात शाळेतील सहशिक्षक धनंजय सानप व त्याचे सहकारी यांनी वारंवार तक्रार निवेदने तसेच डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनानंतर काही दिवसांपूर्वी सीईओ जिल्हापरिषद अजित पवार यांनी शाळेचे मुख्याध्यापक वनवे प्रविण लिंबाजी यांना निलंबित केले होते. मात्र आता सदर शाळेची मान्यताच रद्द केल्याचे अजित जगताप ,कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी प्रादेशिक उपसंचालक ,इतर मागास बहुजण कल्याण विभाग , छत्रपती संभाजीनगर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांना संचालक,इतर मागास बहुजण कल्याण संचालनालय पुणे यांच्या संदर्भीय पत्रावरून निर्देश दिले आहेत .
कक्ष अधिकारी अजित जगताप यांचे निर्देश मान्यता रद्द
—-
संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रमशाळा ,वडझरी ता.पाटोदा जि.बीड या आश्रमशाळेत आवश्यक विद्यार्थी संख्या नसल्याने सदर आश्रमशाळेवर उचित कार्यवाही करणेबाबतचा अहवाल संदर्भीधीन पत्रान्वये शासनास सादर केला आहे.सदर अहवाल विचारात घेता संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रमशाळेत विद्यार्थी अगदी नगण्य असल्याचे दिसून येते.तसेच संस्थेने विद्यार्थी संख्या वाढवण्यास कोणत्याही प्रकारची कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही.सदर संस्थेस कामकाजाबाबत सुधारण्यास वारंवार संधी देण्यात आली होती परंतु संस्थेच्या कामकाजात कोणतीही सुधारणा दिसून येत नाही.त्यामुळे शासनावर सदर संस्थेचा नाहक आर्थिक भार पडत आहे. सदर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरीता चालू शैक्षणिक वर्ष संपताच आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्यात येत आहे.सहाय्यक आयुक्त समाजकल्याण बीड यांनी सदर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे जवळपासच्या आश्रम शाळेत समायोजन करावे.आश्रमशाळेची मान्यता रद्द केल्याने अतिरिक्त ठरलेल्या कायम मान्यता प्राप्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे ईतर आश्रम शाळांमध्ये रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार नियमानुसार समायोजन करावे तसेच संस्थेची मान्यता रद्द झाल्यानंतर संचालक ,इतर मागास बहुजण कल्याण संचालनालय पुणे यांनी प्रचलित शासन नियमानुसार जाहिरात देऊन प्राप्त प्रस्ताव शासनास सादर करावेत असे नमुद केले आहे.