शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जालना जिल्ह्यातील एक व्यापारी किराणा दुकानातील खरेदीसाठी आज दुपारी (ता. 08) शहरात आले होते. यावेळी जालना रोड परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून लंपास केली. या पिशवीत खरेदीसाठी आणलेले साडे चार लाख रुपये होते.व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.
विठ्ठल नानासाहेब आर्दड (वय 67, रा.राजटाकली जि.जालना) यांचे जालना जिल्ह्यात दोन किराणा दुकान आहेत. ते किराणा दुकानातील माल खरेदीसाठी महिन्यातून दोन वेळेस बीड मध्ये येत असतात. आज (ता. 08) सुद्धा ते खरेदीसाठी दुपारी बीड मध्ये आले होते. जालना रोड परिसरात आल्यानंतर त्यांचे वाहन खराब झाल्यामुळे शहरातील साई पॅलेस परिसरातील एका गॅरेजवर ते थांबले होते. खराब झालेले साहित्य आणण्यासाठी ते रस्त्याने जात असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी विठ्ठल आर्दड यांच्या हातातील कापडी पिशवी हिसका देऊन लंपास केली. या पिशवीत आर्दड यांनी खरेदीसाठी आणलेले साडे चार लाख रुपये होते. आर्दड यांच्या तक्रारीवरुन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गेल्या 25 दिवसात शहरात अशा घटना दोन तीन झालेले आहेत. परंतू चोरटे मात्र अजून सापडलेले नाहीत. चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरीकांनी शहरात फिरताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतन राठोड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत, परिसरातील सीसीटिव्ही चेक करत यंञणा कामाला लावली.