-करुणा शर्मा भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याच्या तयारीत
-दसरा मेळाव्यासाठी महंत नामदेव शास्त्री यांची परवानगी घेणार – शर्मा
–माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडेचा त्याच दिवशी वाढदिवस
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : मुंबईतील दसरा मेळाव्यावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वादा सुरु आहे. यादरम्यान आता आणखी एका दसरा मेळाव्यावरुन संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करुणा शर्मा यांनी भगवान गडावर दसरा मेळावा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. आपण मुंडे घराण्याची सून असल्याने मेळावा घेण्याचा अधिकार असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. यामुळे बीड जिल्ह्यात सुद्धा दसरा मेळाव्यावरुन संघर्ष होण्याची शक्यता आहे. मेळाव्यासाठी महंत नामदेव शास्त्री यांनी भेट घेणार असल्याचेही शर्मा यांनी सांगितले.
“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत मीदेखील स्पर्धेत आहे. मी भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ इच्छित आहे. मी गेल्या 26 वर्षांपासून वंजारी समाजाची, मुंडे घराण्याची सून आहे. मीदेखील या स्पर्धेत असून, दसरा मेळाव्याला भगवान गडावर माझं स्वागत करावं अशी महाराष्ट्राला विनंती आहे. सर्वात आनंदाची बाब म्हणजे, माझी मुलगी शिवानी धनंजय मुंडेचा त्या दिवशी वाढदिवस आहे. त्यामुळे तिथे दसरा मेळावा घेणारच,” असा निर्धार करुणा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
भगवान गडावरील मेळाव्याला 50 वर्षाची परंपरा आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे येथे 35 वर्ष हा मेळावा घेत होते. भगवानबाबांनी गड उभारल्यानंतर पहिला मेळावा गडावर घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत भगवानबाबांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता. 2016 मध्ये गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी मेळावा घेण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पंकजा मुंडेंनी भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. 2017 मध्ये त्यांनी भगवानबाबांच्या जन्मस्थळी सावरगाव येथे दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली.