मुलींच्या जन्मदराबाबत गूड न्यूज नाहीच
लेक लाडकी फक्त बोलण्यापुरतीच!
-जिल्ह्यात मुलींचा जन्मदर एक हजार मुलांमागे 937
– जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज
-जिल्ह्यात पीसीपीएनडी ॲक्टचा वापर म्हणावा असा होईना
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात गर्भपाताचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून हे प्रकार रोखण्यासाठी व जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजाग्रती करण्याची गरज आहे. सध्या बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 937 इतका आहे. हाच आकडा 2019 मध्ये 961 वर गेला होता. परंतू परत गेल्या तीन वर्षापासून हा आकडा खाली खाली येत असल्यामुळे परत जिल्ह्यात लाडकी लेक नकोशी झाल्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. पैशासाठी येथील काही डॉक्टर मनमानी करताना दिसत आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्य सरकारने सुद्धा बीड जिल्ह्यात लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर कमी झाल्याचे दिसून येत आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे. कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि त्यामध्ये याच्यावर कोणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही हे सुद्धा यावरुन स्पष्ट होत आहे. 2011-12 मध्ये बीड जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर फक्त 797 होता. तोच दर 2019 मध्ये 961 वर गेल्या होता. हा दर वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. परंतू परत बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर घटत असून तो जन्मदर वाढविण्यासाठी परत विशेष योजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. 2022 मध्ये एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर 937 वर आला आहे. ही बाब परत जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय बनत आहे. बेटी बचाव बेटी पढाव योजनेत प्रबोधन, जागरण, जागृती करण्याची गरज आहे यासह बीड जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याची गरज आहे. 2011 च्या तुलनेत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुलींचा जन्मदर वाढविण्यात प्रशासनास यश आलेले आहे. यापुढे सुद्धा प्रशासनास मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.
जन्मदर आकडेवारी
वर्ष मुलींचा जन्मदर
2010-11 810
2011-12 797
2012-13 893
2013-14 916
2014-15 913
2015-16 898
2016-17 927
2017-18 936
2018-19 961
2019-20 947
2020-21 928
2021-22 937
बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यात अनेक सामाजिक संघटना काम करत आहेत. जिल्ह्यातील नागरीकांनी मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींचा स्विकार करण्याची गरज आहे. रौफ शेख, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड