राज्यातील सफाई कामगार सेल व अनेक वकिलांचा धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
उपस्थितांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात दिसला कमालीचा आत्मविश्वास!
मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता राहील की जाईल अशी स्थिती एकीकडे असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे मात्र पक्ष कार्यात व्यस्त असल्याचे आज दिसून आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सफाई कामगार सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदभाई परमार यांच्या पुढाकाराने आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राज्यातील अनेक जिल्ह्यातील सफाई कामगार आणि मान्यवर वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यादरम्यान गोविंदभाई परमार यांनी सफाई कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या धनंजय मुंडे यांच्यासमोर मांडून त्याबाबत ठोस पावले उचलण्याची विनंती त्यांना केली. तसेच यावेळी धनंजय मुंडेंच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी मुंडे यांनी सर्व उपस्थितांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी लाभली आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे मुंडे म्हणाले. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून आजवर सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी गोविंदभाई परमार यांच्यासोबत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत.
सरकार राहील की जाईल अशी परिस्थिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छा व्यक्त होत आहे हीच आदरणीय शरद पवार साहेबांची आणि पक्षाची ताकद आहे. सत्ता आली तर लोकांची सेवा करायची, सत्ता नसेल तर जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवायचा हीच पक्षाची भूमिका आहे. जनसेवेसाठी, सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील हा विश्वास त्यांनी सर्वांना दिला. आपण सर्वजण मिळून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची भूमिका घेऊ, असे आवाहन करत धनंजय मुंडे यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. या परिस्थितीत बोलताना धनंजय मुंडे यांच्या डोळ्यात कमालीचा आत्मविश्वास दिसून येत होता!
यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे तसेच इतर पक्षाचे पदाधिकारी या पक्षप्रवेशास उपस्थित होते.
यावेळी सचिन कांबळे, डॉ. राजेंद्र शर्मा, बंड्या भाऊ गांगण, लक्ष्मी पटेल, अफसर खान, जितू कागडा, गीता ननावरे, सुवर्णा निकम, इरफान पटेल, राजेंद्र चंदेलिया यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.