अहमदनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होत असताना आता तिसरी लाट आली आहे की काय असा प्रश्न आहे. कारण अहमदनगरमध्ये तब्बल 8881 मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात 77 हजार 929 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी 8881 जण हे 18 पेक्षा कमी वयाची बालकं आहेत. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याबाबतची माहिती दिली.
अहमदनगर जिल्ह्यात मे महिन्यात 77 हजार 929 इतके कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 18 वर्षाखालील रुग्णांची संख्या 8881 इतकी आहे. 0 ते 1 वयोगटातील 85 रुग्ण, 2694 रुग्ण हे 12 वर्षापर्यंतचे आहेत, तर 18 वर्षापर्यंतच्या रुग्णांची संख्या 6102 इतकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली.
- 0 ते 1 वयोगटातील 85 रुग्ण
- 2 ते 12 वयोगट – 2694 रुग्ण
- 13 ते 18 वयोगट – 6102 रुग्ण
लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत आहे. मे महिन्यात नगर जिल्ह्यातील लहान वयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8881 इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. याबरोबरच जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मुलांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत