बीडमध्ये धार्मिक घोषणाबाजीनंतर डॉ.योगेश क्षीरसागर यांचा इशारा
बीड प्रतिनिधी : बीड नगरपरिषदेच्या निवडणुकीत एमआयएम नेहमीप्रमाणेच धर्माच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे, पण विकासाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका नसते. आम्ही यापूर्वीही एमआयएमला बीडमध्ये रोखले आहे. या निवडणुकीतही भाजपच्या माध्यमातून एमआयएमला चांगले फटके देऊ आणि विजय मिळवू असा इशारा भाजपचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिला.
बीड नगरपरिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१८) बीडमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. नगरपरिषद कार्यालयासमोर विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. याच दरम्यान कार्यालयाजवळून जात असताना एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी धार्मिक घोषणा दिल्या. याबाबत डॉ.योगेश क्षीरसागर हे माध्यमांशी बोलत होते. पुढे ते म्हणाले, मी फक्त रस्ता क्रॉस करत होतो, त्यावेळी एमआयएमचे कार्यकर्ते अचानक धार्मिक घोषणा देऊ लागले. आमच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देण्याचा स्पष्ट प्रयत्न होता. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले, असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले. दरम्यान, घटनास्थळी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

















