प्रामाणिक आणि निष्ठावंतांनाच संधी देणार – आ.संदीप क्षीरसागर
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास
बैठकीला हजारो पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती
बीड प्रतिनिधी :- बीड नगर पालिकेच्या निवडणुकीत आपलाच उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.
आगामी बीड नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.११ (शनिवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मोठी गर्दी पाहावयास मिळाली. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत आ. संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना नगर परिषद निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना म्हणाले की,अतिवृष्टीच्या पावसामुळे अनेक ग्रामीण भागात नुकसान झाल्यामुळे नगर पालिकेची निवडणूक अगोदर होणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरोधक जातीचे राजकारण करतील. त्यांना न जुमानता जोमाने कामाला लागा. लोकांना काम करून दाखवायचे आहे. लोकांचे काम केले तर लोक डोक्यावर घेतील. लोकांशी संवाद साधून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर रहा. प्रत्येक वॉर्डात कार्यकर्त्यांनी समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत पक्ष प्रामाणिक आणि निष्ठावंतांनाच संधी देणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. तसेच बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष पदाचा आपलाच उमेदवार हा १० हजार मताने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्व जागेवर नगरसेवक निवडून येतील. आमदारकीच्या निवडणुकीत सोबत राहिलेल्या आणि माझ्यासाठी एकनिष्ठ प्रामाणिक राहून काम करणाऱ्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी घरातला सदस्य समजून काम करून निवडून आणणार ते असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना बळ दिले यावेळी आ.संदीप क्षीरसागरांना देखील कार्यकर्त्यांनी देखील आ.संदीप भैय्या जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याच प्रभागामध्ये साखळी तुटता कामा नये -आ.संदीप क्षीरसागर
शहरातील कोणत्याच प्रभागामध्ये साखळी तुटली नाही पाहिजे. साखळी जर तुटली नाही तर नगर पालिका आपल्याच ताब्यात येणार. जर का कोणी उमेदवार साखळी तोडून गेला तर लोकांना तो माझा उमेदवार नाही असे सांगेल. साखळी तोडणाऱ्याला निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी जनताच पुढाकार घेईल असा इशारा देखील आ.संदीप क्षीरसागरांनी बैठकीत दिला.