बीड तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची केली पाहणी
बीड प्रतिनिधी : मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
आ.रोहित पवार हे बुधवार दि.(०१) रोजी बीडमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्याअगोदर त्यांनी बीडचे जिल्हाधिकारी यांचसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी. त्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना मदत करण्याची हेच योग्य वेळ असून शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. कपिलधारवाडी येथे जाऊन नुकसान पाहणी केली. याठिकाणी रस्ते,जमीन व डोंगर खचले आहे. जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. माळीणसारखी गंभीर घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांचे जीवन आणि संपत्ती धोक्यात आली आहे. याठिकाणी आ.रोहित पवार यांनी परिस्थितीची पाहणी करत पुनर्वसनाची गरज असल्याचे सांगितले. तसेच आपत्ती व्यवस्थापनाकडून संरक्षण भिंत बांधून देण्याची निर्देश दिले.
बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द या गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या व शासनाच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळवून देण्याची मागणी केली.
*आ.रोहित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक*
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनीवरील माती वाहून गेली, घरात पाणी शिरून संसार उध्वस्त झाला, पिके नष्ट झाली – असे न भूतो न भविष्यति संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. या कठीण प्रसंगी शेतकरी बांधवांसोबत ठाम उभे राहत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेश सरचिटणीस तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बीड जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन शासनाने तातडीने व भरीव मदत द्यावी तसेच नागरिकांच्या पुनर्वसनाची गरज असून नागरिकांना शासनाच्या माध्यमात तात्काळ सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची मागणी केली.
रोहित पवारांनी पुराच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबाची घेतली भेट
बीड मतदारसंघातील चौसाळा ते पिंपळगाव घाट गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टीच्या काळात पुलावरून प्रवास करत असताना श्री. स्वप्निल विक्रम शिंदे हे दुर्दैवाने पुराच्या प्रवाहात वाहून गेले. अद्याप त्यांचा शोध सुरूच आहे. आ.रोहित पवार यांच्यासमवेत आ.संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी प्रशासनाला शोध मोहिमेला गती द्यावी अशी विनंती रोहित पवार यांनी केली.