बीड आणि शिरूर (का) तालुक्यातील नुकसान झालेल्या ठिकाणाची दिली यादी
बीड प्रतिनिधी : मागील काही दिवसांपासून बीड व शिरूर (कासार) तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट नुकसाभरपाई देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजित पवार यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड व शिरूर (का) येथे शेतीसोबतच पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. पावसाने पीक, पशुहानी, शेतकरी बांधव व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी व तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांना आ.संदीप क्षीरसागर यांनी निवेदन दिले आहे.
*बीड आणि शिरूर (का) तालुक्यात खालील ठिकाणी पावसामुळे नुकसान*
बीड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्यामध्ये बोरखेड-लिंबागणेश ता.बीड रस्त्यावरील घोलपवस्ती, वाणी वस्तीवरील पूल वाहून गेला, साखरे बोरगाव ता.बीड येथील पुल वाहून गेला, खडकीघाट ते गोगलवाडी – दहिवंडी रस्त्यावरील पूल वाहून गेला, बीड शहरातील मोमीनपुरा येथे घरची पडझड झाली घरात पावसाचे पाणी घुसले, वासनवाडी ता.बीड येथील तलाव फुटला. नागझरी मान्याचावाडा ता. बीड येथील रस्ता व पूल वाहून गेला.
कपिलधारवाडी ता.बीड येथे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून संरक्षण भिंत आणि पूल कोसळला आहे.
नाळवंडी (इजिमा ४६) रस्त्यावरील चिंचोलीमाळी-दहिफळ येथील पुल वाहून गेला.
मोरगाव ता.बीड अंतर्गत जाधववस्ती येथील घरात पाणी घुसले आहे. खडकीघाट ता.बीड येथे घरची पडझड झाली आहे. पिंपळगाव घाट ता. तेलपवस्ती येथील बंधारा कटिंग होऊन शेती वाहून गेली.
शिरूर (का) तालुक्यामध्ये देखील पावसामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये खालापुरी-पाडळी – आनंदगाव व पाडळी – तागडगाव-विसावावस्ती पुल वाहून गेला आहे.
भानकवाडी – रौंधवस्ती नदीवरील पूल वाहून गेला. धनगरवाडी करडपट्टीवस्ती नदीवरील जाणारा पूल वाहून गेला आहे. खालापुरी- बेलूरापांदी नदीवरील पूल वाहून गेला. सांगळवाडी-डोळेवाडी नदीवरील पूल वाहून गेला. जांब तागडगाव सातपुते नदीवरील पूल वाहून गेला. हाजीपूर येथील बंधारा व नदी कटिंग होऊन शेती वाहून गेली आहे.