पुजाताई मोरे यांचे मतदारांना आवाहन
गेवराई : गेवराई तालुका पवार, पंडित यांच्या प्रचंड दहशतीखाली आहे. मनात असूनही लोक बोलायला तयार नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाले मात्र तालुका 60 वर्षांपासून हुकूमशाहीतच आहे. यामुळे गेवराई तालुका दहशतमुक्त करायचाय, त्याला प्रस्तापितांच्या जोखडातून मुक्त करायचे आहे, यासाठी मला साथ द्या, असे आवाहन महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार पुजाताई मोरे यांनी धोंडराई येथील आयोजित कॉर्नर सभेत ग्रामस्ताना केले.
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 तारखेला मतदान होत आहे. गेवराई विधानसभेच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार पूजाताई मोरे यांनी मतदार संघातील प्रत्येक गावाला भेटी देत प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. पूजाताई मोरे यांना ग्रामीण भागातून भेटणारा पाठिंबा आणि प्रोत्साहन पाहता प्रस्थापितांचे धाबे दणाणले आहेत. 16 नोव्हेंबर शनिवारी संध्याकाळी तालुक्यातील धोंडराई येथे पूजाताई मोरे यांची प्रचार सभा झाली. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यावेळी पूजाताई मोरे यांच्या समवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन बंगाळे आणि सहकार्यांची उपस्थिती होती. या सभेत पूजाताई मोरे यांनी अत्यंत आक्रमक भाषण करीत तालुक्याची परिस्थिती ग्रामस्थांना समजावून सांगितली. पूजाताई मोरे म्हणाल्या की, मी शेतकरी संघटनेतून पुढे आली असून, मी टोकाचा संघर्ष केलेला आहे. शेतकरी कष्टकरी यांच्या हक्कासाठी मी लढा दिला आहे. तुमचा आवाज विधानसभेत पोहोचावा यासाठी मी लढत असून, गेवराई तालुक्याचे आणि तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. गेवराई तालुक्यामध्ये प्रस्थापित घराण्याची मोठी दहशत आहे. मी अनेक ठिकाणी प्रचाराला गेले असता तालुक्याचा अभ्यास मला झाला असून, लोक उघडपणे बोलत नाहीत. संपूर्ण तालुका दहशतीखाली असून, देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे झाली तरी गेवराई तालुका हुकूमशाहीत असल्यासारखे दिसते आहे. तालुक्याचे अनेक प्रश्न तसेच पडून आहेत. आमदाराचा मुलगा आमदार तर खासदाराचा मुलगा खासदार होतो आहे. शेतकर्यांच्या मुलांची लायकी असतानाही त्यांना संधी मिळत नाही. काही लोक केवळ आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदारकी मिळवायची असे म्हणतात. ज्यांना फक्त आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे ते तालुक्याचा काय विकास करणार आहेत? असा सवाल पूजाताई मोरे यांनी ग्रामस्थांना केला.
त्या म्हणाल्या, आपला तालुका शेतकर्यांचा कष्टकर्याचा आहे, मात्र गेल्या पंधरा वर्षापासून सत्ता भोगणारे आमदार याबाबत कधी सभागृहात बोलले आहेत का? त्यांना वाटते की मला यांनी पुन्हा निवडून द्यावे. ते आता सांगत सुटले आहेत की माझी ही शेवटची निवडणूक असून मला निवडून द्या, मात्र पुढच्या वेळी ते त्यांच्या मुलाला पुढे करतील आणि म्हणतील की ही माझ्या मुलाची पहिली निवडणूक आहे त्याला निवडून द्या. असेच गेल्या सात वर्षापासून तालुक्यामध्ये सगळे सुरू आहे. प्रस्थापितांनी या तालुक्यावर कब्जा केला आहे. शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांचे या प्रस्थापितांना काहीच देणे घेणे नाही. मी अनेक ठिकाणी गेले मात्र सामान्य लोक आणि व्यापारी सुद्धा दहशतीखाली बोलायला तयार नाहीत. लोकांच्या मनात असताना सुद्धा ते उघडपणे बोलू शकत नाहीत. एवढी दहशत तालुक्यासाठी घातक असून, ती उलथून टाकण्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन पूजाताई मोरे यांनी केले.
त्या म्हणाल्या की, आम्ही शेतकर्यांच्या घरामध्ये जन्माला आलो हा आमचा दोष आहे का? या तालुक्याची परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तन महत्त्वाचे आहे. दोन दिवसांपूर्वी असली राजे असलेले संभाजी राजे छत्रपती यांची आपल्या तालुक्यात सभा झाली. त्यावेळी या लोकांनी मला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या अफवा पसरविल्या. पूजाताई मोरे यांनी पैसे घेतल्या असल्याचा आरोप त्यांनी केला, त्यांचे काहीच वातावरण नसून त्यांना मत देऊन मत वाया घालू नका, असा प्रचार त्यांनी केला. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यातूनच असे आरोप केले जात आहेत. मात्र मी शेतकर्याची मुलगी आहे, कोणासमोर झुकणार नाही. मला पैशाची गरज पडली तर माझ्या गरीब शेतकर्यांच्या समोर मी झोळी पसरेन मात्र स्वाभिमान विकणार नाही. मी चळवळीत वाढलेली आहे. चळवळीतील कार्यकर्ता एका दिवसात घडत नाही, त्यासाठी अनेक वर्ष झगडावे लागतात. अशा कार्यकर्त्यांना डावलले तर तालुक्याचा विकास होणार नाही, यासाठी तुमच्या हातात असलेला अधिकार वापरा आणि तुमच्या लेकीला निवडून द्या, असे आवाहन पूजाताई मोरे यांनी यावेळी केले.