आष्टी: शरदचंद्र पवार ज्यांच्या मागे, त्यांच्याच मागे ही जनता असते. याठिकाणी तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह आपले असून महेबूब शेख यांना निवडून द्या. महेबूब हे आमदार झाल्यावर इथे पाच वर्षे ते सेवक म्हणून काम करतील, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांनी केले.
कडा येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार महेबूब शेख यांच्या प्रचारार्थ जाहिर सभेचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपिठावर उमेदवार महेबूब शेख, खा.बजरंग सोनवणे, खा.निलेश लंके, माजी आ.उषा दराडे, तालुकाध्यक्ष परमेश्वर शेळके, अमोल तरटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रविंद्र ढोबळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष मिनाक्षी पांडूळे, सुनिल नाथ यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.सुळे म्हणाल्या, महेबूब आमदार होणारच आहे, परंतु त्याआधी माझ्या काही अटी आहेत. ते पुढील पाच वर्ष इथले सेवक असणार आहेत, या जिल्ह्यातील दडपशाही बंद झाली पाहिजे, यासाठी ते काम करतील. आम्ही कोणालाही घाबरत नाहीत. आज विरोधात लढत असले तरी मेहबूबने समोरच्या उमेदवाराचे नाव घेतले. बाळासाहेब आजबे यांच्या कामाचा उल्लेख केला. विरोधक असताना चांगल्याला चांगले म्हणण्याची आमची संस्कृती आहे. येणाऱ्या काळात बीडला एअरपोर्ट करण्यासाठी आपण ताकतीने उभा राहू, येथील विकासासाठी आम्ही कमी पडणार नाहीत. भाजपातील मित्रपक्ष रडीचा डाव खेळत आहेत. पण जिल्हा नेहमी पवार साहेबांबरोबर उभा राहतो.या जिल्ह्यात काही लोक चमत्कारी आहेत.मागील भाई पवार साहेबांमुळेच निवडून आले होते. पवार साहेब ज्यांच्या मागे त्यांच्याच मागे ही जनता असते.जनता आमच्याबरोबर होती म्हणून मी आणि अमोल कोल्हे निवडून आले.आम्ही धमक्या देत नाही आणि कोणाला घाबरत पण नाही. आदर करू पण दडपशाही खपवून घेतली जाणार नाही.कोणी बोगस मतदान करत असेल तर एक रेकॉर्डिंग मला पाठवा. त्यांचा करेक्ट कार्यक्रम मी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याठिकाणी बजरंग सोनवणे यांना तुम्ही खासदार म्हणून निवडून दिले. यापुढे जिल्ह्यात सर्वत्र तुतारी वाजेल. अगदीजेव्हा बजरंग सोनवणे साखर कारखाना काढणार तेव्हा पण तुतारी वाजणार आहे. आज साहेब पुन्हा पावसात भिजले. पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
चालू भाषणात साधला संवाद
खा.सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू असताना त्यांनी जनतेला सवाल केला. यावेळी गर्दीत बसलेले दासूपंत लवांडे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. लवांडे यांनी शरद पवार यांचे बंधू अप्पासाहेब पवार यांची आठवण काढली. यावेळी त्यांनी असे जेष्ठ लोक आपल्या सोबत आहेत, त्यामुळे आपला विजय होईल, असा विश्वासही सुप्रीया सुळेंनी व्यक्त केला.