माजी मंत्री जयंत पाटील यांचा विश्वास
राज्यातील भाजप नेते आणि त्यांच्या मित्र पक्षांनी महाराष्ट्र भाजपला आंदण देवून त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले
—– जयंत पाटील
केज :- एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या महायुतीतील सर्वांनी महाराष्ट्र हा गुजरातला आंदण देवून गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारले आहे. राज्यातील महत्वाचे उद्योगधंदे बाहेर गेले आहेत तर तिजोरीत पैसे नसताना लाडकी बहीण सारख्या योजना जाहीर करून शेंडी लावण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र आमचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना तीन हजार रू एवढे भरीव अनुदान देवून शेतकऱ्यांची कर्जमाफी बेकाराना आर्थिक मदतीस सह सर्वांना मोफत आरोग्य सेवा दिली जाईल असे सांगितले. तसेच पक्षावर अनेक प्रसंग आले तरी पृथ्वीराज साठे डगमगले नाहीत, त्यांनी पक्षाची साथ सोडली. म्हणून त्यांना पवार साहेबांनी संधी दिली. त्यांची आर्थिक बाजू कुमावत असली तरी स्वभावाने गरीब असलेल्या माणसाला लोक ओळखतात. ही लढाई विचारांची, धनशक्ती विरुद्ध लोकशक्तीची आहे. म्हणून केजमध्ये १०० टक्के बदल होणार असून पृथ्वीराज साठे हेच आमदार होणार आहेत. असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
केज येथे विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील हे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी सभापती राजेसाहेब देशमुख हे तर पक्ष निरीक्षक जिवन गोरे, खासदार बजरंग सोनवणे, उमेदवार पृथ्वीराज साठे, माजी आ. संगीता ठोंबरे, डॉ. अंजली घाडगे, नगराध्यक्षा सीता बनसोड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदे, सुशीला मोराळे, शेकापचे भाई मोहन गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लाखो तरुणांना रोजगार देणारे उद्योग गुजरातला गेले, त्यांना मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी दिल्लीला घाबरून मांडलिकत्व स्वीकारले. त्यामुळे महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न कमी झाले, तर गुजरातचे दरडोई उत्पन्न वाढले. गुजराथी लोक श्रीमंत झाले. भाजपने जाणीवपूर्वक जाती – जातीमध्ये, समाजा – समाजामध्ये, धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला. स्वाभिमानी महाराष्ट्र असून लढणाऱ्याच्या पाठीमागे उभे राहणारा महाराष्ट्र आहे. महागाई, जीएसटी, बेकरीने जनता बेजार असून सत्तेत असलेल्या आमदारांना अंबाजोगाई जिल्हा, बुट्टेनाथ व कोरडेवाडी तलावाचा प्रश्न सोडविता आला नाही. म्हणून हे प्रश्न सोडवून घेण्यासाठी पृथ्वीराज साठेंना निवडून देण्याचे आवाहन ही पाटील यांनी केले.
————-
मुंदडांनी एकगठ्ठा मतांची अपेक्षा करू नये – खा. बजरंग सोनवणे
गत २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंदडा हे भाजपला मॅनेज झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी असताना कधीच भाजपच्या खासदारांवर टीका टिप्पणी केली नाही. तर पवार साहेबांनी तिकीट देवून सुद्धा त्यांनी गद्दारी करीत भाजपात गेले. त्यांनी नाद कुणाचा ही करावा, पण पवार साहेबांचा करू नये, ते कुस्ती न करताच समोरच्याची पाठ लोळवितात. त्यांनी एकगठ्ठा मतांची अपेक्षा करू नये. आता जनताच मुंदडा यांची सत्तेची मस्ती उतरविणार. अशा शब्दात खा. बजरंग सोनवणे यांनी टीका केली.
मुंदडांची हुकूमशाही व दडपशाही नष्ट करा – पृथ्वीराज साठे
मतदार संघात आमदार मुंदडांची वाढलेली हुकूमशाही व दडपशाही मतदारांनी नष्ट करावी. मला मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यास सर्वांना हेवा वाटेल असा विकास करून दाखवीन अशी ग्वाही उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी दिली.