मी लढा देणारच तुम्ही साथ द्या – खांडे
बीड प्रतिनिधी : तुरुंगवास आणि विजनवास हा प्रभु श्रीकृष्णाला आणि प्रभु श्रीराम याना सुध्दा चुकला नाही. नका ते आरोप करुन चांगल्यांना बदनाम करण्याची परंपरा होती आणि आहे. माझ्यासोबतही तेच घडले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण समाजकारण आणि राजकारणात बदल घडवू पाहात आहे हे प्रस्थापितांच्या नजरेत खुपले म्हणूनच मला दुर्लक्षीत करण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र मी सर्वसामान्यांच्या पाठबळावर लढा देणारच आणि तुमच्यामुळेच मी आज सक्षमपणे निधड्या छातीने लढण्यास तयार झालो असल्याचे प्रतिपादन सरपंच/उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी केले आहे. दोन महिन्याच्या तुरुंगवासातून बाहेर आल्यानंतर हजारो समर्थकांनी खांडे यांचे जोरदार स्वागत केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
जून महिन्यात कुंडलिक खांडे यांना एक प्रकरणात राजकिय हस्तक्षेपामुळे अटक झाली होती. शेवटी न्यायालयाने अॅड.सुदर्शन सोळंके यांच्या सह ॲड.बाळासाहेब कोल्हे आणि ॲड.शशिकांत सावंत बचावात्मक कथनाला योग्य मानत कुंडलिक खांडे यांना जामिन दिला. शुक्रवारी सायंकाळी कुंडलिक खांडे यांची मुक्तता झाली. खांडे यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिक स्वयंस्फुर्तीने त्यांच्या स्वागताला आली.सर्वसामान्यांच्या अलोट प्रेमाला साक्षी मानत कुंडलिक खांडे म्हणाले की, चुकीच्या खटल्यात मला अटक झाली होती. परंतु जनसामर्थ्य आजही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. लोक चुकीचे आरोप करतात मात्र न्यायालय कायम न्याय देते. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता तो फक्त मी अतिशय लहान कुटुंबातून आलो आहे. मी संघर्ष केला आहे. मला कोणाचाही वरदहस्त नव्हता. गोरगरीब, उपेक्षीत, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मी लढलो आणि यापुढेही लढणार आहे ते फक्त तुमच्या पाठबळावर. लढणे हा माझा स्वभाव आहे मी तुमच्यासाठी यापुढेही अहोरात्र कष्ट करीन. तुम्ही फक्त हाक द्या मी माझ्या परीने सर्व शक्तीने साथ देईल असे भावनिक आवाहन कुंडलिक खांडे यांनी केले.
कुंडलिक खांडे यांना दोन उजी महिन्यानंतर जो जामीन मिळाला त्याबद्दल जनतेत समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळेच शुक्रवारी खांडे समर्थक हजारोंच्या संख्येने त्यांच्या स्वागताला उपस्थित राहिले हे दिसले.