बीड शहरातील मुख्य रस्त्यासह जिल्ह्यातील अन्य रस्त्यांना मिळणार बळकटी
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश आले असून जिल्ह्यातील परळी ते गंगाखेड (३६१एफ) या रस्त्याच्या कामासाठी ना. धनंजय मुंडे यांनी पूर्वी घोषित केल्याप्रमाणे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने २२४.४४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
परळी ते गंगाखेड (३६१एफ) या रस्त्याची दुर्दशा झालेली असून, या रस्त्याचे रुंदीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊनही याबाबत अनेकवेळा विनंती केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अखेर यश मिळाले असून, लवकरच या रस्त्याची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.
दरम्यान बीड शहर बायपास ला जोडणाऱ्या शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यासाठीही निधी देण्याबाबत अनेकवेळा मागणी करण्यात आली होती. बीड शहरातील बायपासला जोडणाऱ्या जिरेवाडी ते बार्शी रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील अन्य प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी ७५ कोटी रुपये निधी केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडून मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या अन्य राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी मा. नितीन गडकरी यांच्याकडे आणखी निधीची मागणी येत्या काळात करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.