लोकशाहीमध्ये सर्व समान दिव्यांगांनी करावे शंभर टक्के मतदान
गेवराई :बीड लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील दिव्यांग मतदार बांधवांचे १०० टक्के मतदान व्हावे या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांच्या आदेशाने तसेच जि.स.क. अधिकारी रविंद्र शिंदे, वै.सा.का अंकुश नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई शहरात विस्तार अधिकारी अंबादास चव्हाण यांच्या हस्ते मंगळवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी १० वा.दिव्यांग मतदार जनजागृती फेरीस हिरवा झेंडा दाखवून जनजागृती फेरी काढून जनजागृती अभियान राबविण्यात आले.यावेळी दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
बीड जिल्ह्यामध्ये दि. १३ मे २०२४ रोजी लोकसभेसाठी मतदान होणार असून.या मतदान प्रक्रियेमध्ये दिव्यांग असणाऱ्या मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून मा.जिल्हाधीकारी यांच्या आदेशाने जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत व तालुक्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने दिव्यांग मतदार जनजागृती अभियान ही मोहीम राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी गेवराई शहरात जनजागृती फेरी काढण्यात आली. फेरी दरम्यान ऊठ दिव्यांगा जागा हो लोकशाहीचा धागा हो, लोकशाही मध्ये सर्व समान दिव्यांगांनी करावे शंभर टक्के मतदान, दिव्यांग जनाचा पुकार मतदान आपला अधिकार, यासह अदि घोषणा देवून जनजागृती करण्यात आली. या जनजागृती फेरीमध्ये कै.कैशवरावजी धांडे मतिमंद निवासी विद्यालय तलवाडा, मतिमंद निवासी विद्यालय गेवराई, मतिमंद निवासी कार्यशाळा तलवाडा या दिव्यांग शाळेतील शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवून परिश्रम घेतले.