गेवराईतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमुखी ठराव मंजूर; बैठकीला हजारो बांधवांची उपस्थिती
गेवराई : मराठा समाजाला ओबीसीतून हक्काच्या अरक्षणाची मागणी असताना राज्य सरकारने मराठा समाजावर ५० टक्क्याच्या वरती स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिले असून हे लादलेले आरक्षण आम्हाला नको. सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी करुन सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. तसेच मराठा समाजाला ओबीसीतून जोपर्यंत आरक्षण देणार नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या स्टेजवर जाणार नाही. आम्ही कोणत्याही पक्षाचे बांधिल नसून मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. त्यामुळे यापुढे देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणाचा लढा लढला जाईल यासह विविध ठराव गेवराईतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आले. तसेच सरकारकडून आंदोलन मोडीत काढण्यासाठी सुरु असलेल्या दडपशाहीचा निषेध करुन या बैठकीत मराठे योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत राहून आंदोलनाची पुढील दिशा देखील ठरविण्यात आली.
सगेसोयरे अधिसूचना अंमलबजावणी तसेच मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवणे आणि मनोज जरांगे पाटील यांना बळ देण्यासाठी गेवराई येथे बैठकीची हाक देण्यात आली होती. दरुया बैठकीला हजारों बांधवांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावल्याने एकप्रकारे सभेचे स्वरूप आले होते. या बैठकीत मराठा समाज कोणत्याही राजकीय सभेला जाणार नाही किंवा राजकीय पुढाऱ्याच्या स्टेजवर जाणार नाही, १०% आरक्षणाला मराठा समाजाची सहमती नसून आमच्या हक्काचे सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व सगेसोयरे कायदा तात्काळ करण्यात यावा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी तालुक्यातील मराठा समाज तन मन धनाने उभा होता आहे व राहिल, नमुना नं.३३,३४ वरील कुणबी नोंदी शोधणारे मोडीलिपी तज्ञ संतोष यादव यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते संमत झाला, संविधानिक आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला तर सर्व समाज जेल भरो आंदोलन करेल, साखळी उपोषण सर्व संविधानीक मार्गाने केले जातील, गेवराई तालुका समिती सर्व सामान्य जनतेला, व्यापाऱ्याला त्रास होईल असे आंदोलन समिती करणार नाही, आपण समाज म्हणुन संघटित रहावे, सर्व समाज बांधवांनी मा. राज्यपाल, मा. राष्ट्रपती यांना लेखी व मेलद्वारे निवेदन द्यावेत, गेवराई तालुका समिती कुठलेही असंविधानीक आंदोलन करणार नाही. परंतु समाजातील बांधवाला विनाकारण गोवण्याचा किंवा प्रशासनाने कुठलाही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास तालुक्यातील सर्व समाज रस्त्यावर उतरेल, कुणबी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया खंडीत झाली असुन ती प्रक्रिया पहिल्याप्रमाणे चालु ठेवावी आदी सर्वानुमते ठराव गेवराई तालुका कुणबी मराठा समन्वय समिती व समाजबांधव यांच्या एकमताने मंजूर करण्यात आले. या बैठकीला शहर तसेच तालुक्यातून हजारो बांधवांची उपस्थिती होती.
कोपर्डी घटनेतील नराधमावर हल्ला करणारा अमोल खुने सन्मानित
कोपर्डी (ता. कर्जत) येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केलेल्या गुन्ह्यामधील आरोपीवर न्यायालयाच्या आवारात हल्ला करुन त्यांना चोप देण्यात आला होता. दरम्यान यामधील अमोल खुने हा मनोज जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असून त्याचा या बैठकीत उपस्थित महिला भगिनींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दरम्यान मी समाजाशी कधीही गद्दारी करणार नसून सरकारने कोणताही दबाव टाकला तरीही मी कायम मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत असेल, असे त्यांनी सांगितले.